बीड (रिपोर्टर)ः- देशाची राजधानी दिल्ली येथे 98 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे. त्या साहित्य संमेलनाच्या महत्वाच्या स्थळाला साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात येणार आहे. तसे पत्र अखिल भारतीय साहित्य मंडळाकडून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाला देण्यात आले आहे.अशी माहिती डीपीआयचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बीड शहरातील हॉटेल निलकमल येथे सोमवार (दि.17) रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अजिंक्य चांदणे बोलत होते. या पत्रकार परिषदेला उत्तम पवार, बाप्पा सोनवणे, सुभाष लोणके, नवनाथ कांबळे, विजय चांदणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अजिंक्य चांदणे म्हणाले की, दिल्लीत येत्या दि.21,22, 23 या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या कार्यक्रमाचे उदघाटक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असून स्वागताध्यक्ष म्हणून शरदचंद्र पवार असणार आहेत. अजिंक्य चांदणे असंही म्हणाले की,मराठी साहित्यात आण्णाभाऊ साठे यांचे नाव अग्रगण्य असेच आहे. त्यांच्या फकिरा कादंबरी जगातील 27 भाषांमध्ये भाषांतरीत झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची साहित्य संमेलनात दखल घेतली जावी, यासाठी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाकडून राज्यातील बीड,सातारा, कोल्हापूर, सांगली, वाशीम, लातूर, जालना, छत्रपती संभाजी नगर,बुलढाणा आशा विविध जिल्ह्यात या विषयाच्या अनुषंगाने आंदोलने झाली.संबंधित जिल्हाधिकारी यांच्या मार्फत साहित्य मंडळ पुणे यांना लेखी निवेदने देण्यात आली होती. या चळवळीला व आंदोलनांना योग्य प्रतिसाद देत साहित्य मंडळाने आमच्या आंदोलनाची व मागणीची दखल घेत, पक्षाच्या नावाने पत्र जाहीर करून अण्णाभाऊंचा यथोचित सन्मान केला जाईल असे कळवले आहे. त्यामुळे ही पत्रकार परिषद घेऊन आम्ही साहित्य मंडळ पुणे व संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे आभार व्यक्त करत आहोत.तसेच हा लढा यशस्वी करणार्या सर्व अण्णाभाऊ साठे अनुयायांचे, पक्ष पदाधिकार्यांचेही आम्ही आभार व्यक्त करत आहोत.असे अजिंक्य चांदणे म्हणाले.
चौकट
आण्णा साहित्याची खान…
साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून 35 कादंबर्या, 14 लोकनाट्य,13 कथा संग्रह, 10 पोवाडे, 7 चित्रपट कथा, 1 प्रवास वर्णन असा मराठीचा खजिना तयार केला. आण्णाभाऊ साठे यांची फकिरा कादंबरी जगातल्या 27 भाषांमध्ये भाषांतरीत आहे.
चौकट
वाटेगावाला साहित्य संमेलन व्हावे
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे मराठी साहित्यात अतिशय मोठे स्थान आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील वाटेगाव या जन्मगावी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविले जावे. या मागणीसाठी आपण साहित्य मंडळाकडे मागणी करणार आहोत. असे स्पष्टीकरण डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी बीड येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिले