गणेश सावंत –
सत्यासाठी, हक्कासाठी अन् न्यायासाठी याच महाराष्ट्राच्या नरविरांनी कधीकाळी स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवले. पदरामध्ये विस्तव घेतले. धगधगत्या अंगार्यावर चालत स्वत: विस्तवाचे निखारे बनले. कोणी रक्ताभिषेक करून स्वराज्य निर्माण केले, कोणी अपमान पचवून महिलांना साक्षर केले, कोणी क्षुद्र म्हणून हिणवले तरी या देशाला संविधान दिले तर कोणी महाराष्ट्राच्या अभिमान आणि स्वाभिमानासाठी स्वत:च्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिले. त्याच महाराष्ट्रात आजची परिस्थिती काय? इथे सत्यासाठी, हक्कासाठी अणि न्यायासाठी कोणी लढतय का की केवळ सत्तेसाठी आत्मिक अर्थाजनासाठी अन् अन्यायासाठीच जो तो राजधर्म पाळतोय का? असे सवाल महाराष्ट्राची आजची एकंदरीत परिस्थिती पाहता उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. ज्या महाराष्ट्रामध्ये शेतकर्याच्या भाजीच्या देठाला हात लावायची हिंमत नव्हती त्या महाराष्ट्रात अख्खे पिक खुडून नेले जात आहे. जिथे बलात्कार्याचा चौरंगा केला जातो म्हणून प्रत्येक महिलेकडे बाई ही रुक्मिन समान पाहितली जात होती तिथे आज स्त्रीकडे भोगाची वस्तू म्हणून पाहितलं जातय. सत्ता ही जनकल्याणासाठी असते. हे सत्तेचे ब्रिद आता सत्ता ही स्वकल्याणासाठीच असते. ही जी भावना आजच्या राज्यकर्त्यांनी करून ठेवलीय ना त्यातूनच गर्जा महाराष्ट्र नव्हे तर
नासतोय महाराष्ट्र
ही चिंता आजची महाराष्ट्रातील गुन्हेगारी पाहता व्यक्त झाली तर त्यात चुकीचे काहीच ते नाही. महिलांवरचे अत्याचार, सर्रासपणे केले जाणारे बलात्कार, राजकारण्यांच्या हस्तकांची वाढती गुन्हेगारी, त्यातून होणारे खून, त्यांना मिळणारे राजकीय संरक्षण आणि वाढत चाललेली आराजकता उभ्या स्वाभिमानी आणि चळवळीच्या महाराष्ट्राला गुन्हेगारीची किनार लावून जात आहे. पुणे, मुंबईतील बलात्काराच्या घटना असोत अथवा कायदा हातात घेत लोकांना केली जाणारी मारहाण असो, त्यापेक्षा निर्ढावलेला पणा म्हणजे मारहाण करताना, खून करताना केले जाणारे चित्रीकरण हे कायद्याचा धाक नसल्याचे धोरण सध्या इथेच पहायला मिळत आहे. जेव्हा राजसत्तेचे आशिर्वाद गुंड-पुंडांना राहतात तेव्हाच कायद्याचा धाक हा संपुष्टात येतो आणि तिथेच हे कायद्याचे राज्य नाही तर काय द्यायचे राज्य आहे, हे स्पष्ट होते. इथेच हे राज्य नासावे ही सत्ताधार्यांची इच्छा हे सांगून जाते. गेल्या काही महिन्यांच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने
बीड जिल्ह्याचा झेंडा
गुन्हेगारीच्या आलेखावर फडकत आहे, त्यातून गुन्हेगारी प्रवृत्ती ही एकट्या बीड जिल्ह्यातच आहे हे दाखवण्याचा जो केविलवाणा प्रयास विशिष्ट चष्माधारी राजकारण्यांकडून आणि त्यांचे हस्तक झालेल्या इलेक्ट्रॉनिक मिडियाकडून केला जातोय तो प्रयास इथल्या गुंडगिरीचे उच्चाटन करण्यासाठी आहे का? हा सवाल उपस्थित होताना उभ्या महाराष्ट्रात होणार्या दोन महिन्यांच्या कालखंडातील घटना पाहितल्या आणि त्याचे चिंतन-मंथन केले तर ‘पाहितली ती चोरी, नसता शिरजोरी’ असे दिसून येते. मदमस्त झालेल्या आणि पैशाचा माज असलेल्या युवराजांनी उभ्या महाराष्ट्रात कितीही दंगे केले, तर ते पडद्याआड राहतात. काल-परवाची घटना पैशाने माजलेल्या आणि बापाच्या पैशावर मौजमजा करणार्या तरुणाने पुण्यात उभाट्याने मुत्रार्जन केले. त्याला आडवायला गेलेल्या अन्य सर्वसामान्य लोकांवर तो नुसता तुटून पडला नाही तर त्याने स्वत:चे जनंद्रीय हलवून त्या लोकांना हिणवले, हा माज केवळ आणि केवळ कायद्याचा धाक राहिला नाही म्हणूनच पहायला मिळतो. बीड जिल्ह्याची बदनामी केली जातेय का? तर हो केली जाते. बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती बळावतायत का तर नक्कीच बळावतायत. बीड जिल्ह्याच्या
गुन्हेगारीला जबाबदार कोण?
या प्रश्नाचं सरळसरळ उत्तर शासन, प्रशासन, राज्यकर्ते असेच देता येईल. एखाद्या प्रकरणावरून कुठे वाद झाले, डोक्याची फुटाफुटी झाली तर भारतीय संविधानानुसार दोषींवर कारवाई व्हायला हवी, मात्र इथं पोलीस स्टेशन हे वरिष्ठ अधिकारी नव्हे तर एकतर दलाल चालवतात, नाही तर राजकारणी चालवतात. कुणावर कुठला गुन्हा दाखल करायचा हे घटनेचे गांभीर्य पाहून नव्हे तर कुणाचा फोन येतो, यावरून ठरवलं जातय. त्यामुळे लोकांना न्याय सोडा सर्वसामान्यावर अन्यायच होतो. वरिष्ठ पोलीस अधिकारी कितीही चांगले असले तरी चिरीमिरीचे आणि लाचेचे रगद तोंडाला लागलेल्या खालच्या यंत्रणेकडून पोलीस ठाण्याचा सद्रक्षणाय खलनिग्रणाय नव्हे तर तोडपाणीचा अड्डा होऊन बसलाय. म्हणूनच बीड जिल्ह्यात एखाद्या किरकोळ वादाचे रुपांतर गंभीर घटनाक्रमाला अंजाम देण्यात सातत्याने झाले आणि इथेच बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था बोकाळली. स्त्री अत्याचार असोत, अथवा मारामार्या, खून, दरोडे असोत इथे
आका आणि खोका
यांचे साम्राज्य पहायला मिळते. स्वत:च्या सत्ताकारणाचे गणित जुळवताना कोणी जर आकाचा जप करत असेल तर इथे खोका कधी जन्म घेईल आणि त्याची जन्मकुंडली कधी बाहेर येईल हे सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात खोका नाम सातत्याने चर्चीले जाते. शिरूरचा सतीश भोसले हा एका राजकारण्याचा हस्तक आणि समर्थक ज्याचे खायचे वांदे, तो जेव्हा पाचशेच्या नोटांचे बंडले गाडीच्या डेस्कटॉपवर फेकतो, स्वत:च्या अंगावर पैशाची उधळण करतो, शाळा-महाविद्यालयात जात हात-पाय तोडण्याची धमकी देतो, हरणाची शिकार करतो, त्याच्या मांसावर ताव मारतो हे एवढे वर्षे सुरू असताना आमच्या वनविभागाला माहिती होत नाही, आमच्या पोलीस यंत्रणेला माहित होत नाही, मात्र अचानक गुन्हेगारी प्रवृत्तीची जन्मकुंडली जेव्हा समोर येते तेव्हा उभा जिल्हा नव्हे उभ्या महाराष्ट्राला प्रश्न पडतो इतके दिवस यंत्रणा झोपली होती का? होय, जेव्हा
पोलीसच बलात्कारी
निघतात तेव्हा बीडची यंत्रणा झोपलेलीच असते. हे स्पष्ट होते. ही कालचीच घटना पाटोदा पोलीस ठाण्यात एक बाई कामानिमित्त सातत्याने येते, तिचे आणि बिटअंमलदार असलेल्या उद्धव गडकर यांच्यात संपर्क सुरू होतो, पुढे फोनवर बोलणे, मॅसेज अन् काल उद्धव गडकर कडून चोरीचा खोटा गुन्हे दाखल करण्याची धमकी देत त्या महिलेवर बलात्कार केला जातो. हा विषय इथे मांडण्याचा खटाटोप एवढ्यासाठीच कारण उद्धव गडकर या पोलिसाला सवय आहे, खोटे गुन्हे कसे दाखल करायचे आणि ती सवय जणू जिल्ह्यातल्या पोलीस ठाण्यांमध्ये परंपरा होऊन बसलीय. जेव्हा संरक्षण करणारे पोलीस कर्मचारी बलात्कार करत असतील तर इथली व्यवस्था आणि कायद्याचा धाक खरचं राहिलाय का? हा शोधाचा नव्हे नव्हे तर बोधाचा विषय होऊन बसलाय.
हे राज्य सुरक्षित रहावं
इथल्या आया-बहिणी निर्भयपणे वागाव्यात, सर्वसामान्यांना न्यायासाठी भटकंती करावी लागणार नाही यासाठी खरेतर आता पावले उचलायला हवीत, त्यासाठी पोलीस खात्यातल्या लाचखोरीबरोबर प्रशासन व्यवस्थेतील लाचखोरी सर्वप्रथम बंद व्हायला हवी, पाठोपाठ शासन चालवणार्या शासनकर्त्यांनी खर्याला खरं आणि खोट्याला खोयं म्हणण्याची हिंमत ठेवावी. त्याच्याकडे पन्नास मते आहेत म्हणून तो खोटा असला तरी त्याला खरा दाखवण्याचा जो प्रयास राजकारण्यांकडून केला जातोय ते आधी बंद व्हायला हवे. राज्य हाकताना पुढील निवडणुकीचे गणित आणि मताची बेरीज न पाहता राज्यकर्त्यांनी ‘सर्वास पोटास लावणे आहे’ हे धोरण आखले तर आणि तरच हे राज्य सुरक्षित असेल, परंतु एखाद्या गंभीर विषयावर उभा महाराष्ट्र जेव्हा पेटतो तेव्हा आमचे राजकारणी त्या विषयावरून लोकांचं लक्ष हटवण्यासाठी जेव्हा महाराष्ट्राच्या आस्मितेला हात घालत महापुरुषांच्या अपमानावर एखाद्या वळूगत शेपूट वर करून उधळताना दिसतात तेव्हा पुन्हा-पुन्हा महापुरुषाचा अपमानच नव्हे तर महापुरुषांचे नाव स्वत:चे पाप झाकण्यासाठी करतात हे सिद्ध होत गेले आहे. अजून वेळ गेलेली नाही महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यात दहा-पाच नासके असू शकतात, त्या नासक्यांना अभय न देता निर्भयपणे मुसक्या बांधल्या तर नक्कीच हा महाराष्ट्र पुन्हा एकदा शिवबांचा स्वराज्य होईल.