बीड : -ऑनलाईन रिपोर्टर
सुदर्शन घुले, बीडची आठवले गँग, यानंतर आता आष्टीच्या भोसले गँगवर मकोका लावण्यात आला आहे. मागील दोन महिन्यांत अशा प्रकारच्या तीन कारवाया केल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत पहिल्यांदाच मकोकामध्ये महिलांचा आरोपी म्हणून समावेश झाला आहे. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत हे गुन्हेगारांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत.
आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजिनाथ विलास भोसले, भरत विलास भोलसे, या दोन सख्ख्या भावांचा खून करून कृष्णा भोसले याला गंभीर जखमी केल्याची घटना १६ जानेवारी २०२५ रोजी वाहिरा येथे घडली होती. याप्रकरणी अजिनाथची पत्नी चिब्बा (वय ३०) हिच्या फिर्यादीवरून अंभोरा ठाण्यात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी यातील सहा आरोपींना अटकही केली होती. त्यानंतर अंभोरा पोलिसांनी या सर्व आरोपींच्या गुन्ह्यांची माहिती काढून मकोकाचा प्रस्ताव तयार केला. १० मार्च रोजी हा प्रस्ताव पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडे आला. त्यांनी दुसऱ्याच दिवशी तो शिफारशीसह छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांना पाठविला. त्यांनी १९ मार्च रोजी याला मंजुरी दिली आहे. त्याप्रमाणे आता पहिल्या खुनाच्या गुन्ह्यात मकोकाचे कलम वाढविण्यात आले आहे. याचा पुढील तपास हा आष्टीचे उपविभागीय पोलिस अधिकारी बाळकृष्ण हनपुडे हे करत आहेत.
सदरच्या घटने मध्ये दीपक ऊर्फ सलीम नारायण भोसले (वय ३५, रा. वाहिरा, ता. आष्टी), सोमीनाथ ऊर्फ नाज्या दिलीप काळे, (वय ३५, रा. घु. पिंपरी, ता. आष्टी), मुद्दसर मन्सूर पठाण (वय ३८, रा. कानडी खुर्द, ता. आष्टी), सोनी ऊर्फ अनिता गोरख भोसले (वय ४०), शशिकला दीपक भोसले (वय ३५) व संध्या कोहिनूर भोसले (वय २१, सर्व रा. वाहिरा, ता. आष्टी), असे सहा आरोपी अटक आहेत. आणखी तीन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध पोलिस घेत आहेत.सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी बाळकृष्ण हानपुडे पाटील, पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मंगेश साळवे, मुकेश एकशिंगे, केदार, सपोउपनि अभिमन्यू औताडे, नीलेश ठाकूर, बिभीषण चव्हाण आदींनी केली आहे.