बीड, (रिपोर्टर)ः- बीडमधील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील तपास अधिकारी पुन्हा एकदा बदलण्यात आले आहेत. तिसर्यांदा तपास अधिकारी बदलल्यानं आता सरकारचं नेमकं काय सुरु आहे? असा प्रश्न विचारला जात आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख खून प्रकरणाबरोबर महादेव मुंडे खून प्रकरणाचा विषय सातत्यानं लावून धरला होता.
सुरुवातीला या केसचा तपास गुन्हे शाखेकडं होता. त्यानंतर गेवराईचे पोलीस उपाधीक्षक एमडी राजगुरु यांच्याकडं हा तपास देण्यात आला होता. त्यानंतर कालच सोमवारी अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडं हा तपास वर्ग करण्यात आला होता. पण आता पुन्हा काही तासांतच यातील तपास अधिकारी पुन्हा बदलले आहेत. त्यामुळं आता केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास करणार आहेत. म्हणजेच केवळ महिनाभरातच या प्रकरणात तीन तपास अधिकारी बदलण्यात आले आहेत.
दरम्यान, महादेव मुंडे यांच्या पत्नीनं याप्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं होतं. त्याचबरोबर सुरुवातीला सुरेश धस यांनी हे प्रकरण सातत्यानं लावून धरलं. पण याप्रकरणातील तपासावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळं सातत्यानं तपास अधिकारी देखील बदलण्याची नामुष्की सरकारवर आली. पण यात अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.