पाटोदा (रिपोर्टर): पाटोदा तालुकाअंतर्गत पंचायत समितीमध्ये अनेक कामे असतात, मात्र कार्यालयीन कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय गोरगरिबांची कामे करत नाहीत, भ्रष्ट कर्मचार्यांवर बीडीओंचे नियंत्रण राहिलेले नाही. चुंभळीच्या ग्रामपंचायतमध्येही अंधाधूंद कारभार सुरु असून पं.स.च्या निषेधार्थ आज गावकर्यांनी पंचायत समितीच्या कार्यालयात खेळणीतले पन्नास लाख उधळून निषेध व्यक्त केला.
चुंभळी ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांच्या कारभारासंदर्भात बीडीओंकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या, याची दखल त्यांच्याकडून घेतली गेली नाही तसेच पं.स.मध्ये तालुक्यातील नागरिकांची कामे असतात, पं.स.तील कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय गोरगरिबांची कामे करत नाहीत. घरकुल, विहीर, फळबाग यासह आदी कामे रखडून पडलेले आहेत. कित्येक शेतकर्यांचे पैसे सुद्धा निघालेले नाहीत. पंचायत समिती कार्यालयात सर्वसामान्यांची पिळणूक होत असून भ्रष्ट कारभाराच्या विरोधात आज चुंभळी ग्रामस्थांनी कार्यालयात खेळणीतले पन्नास लाख रुपये उधळून जाहीर निषेध केला आहे. या वेळी गोरख झेंड, आदिनाथ नागरगोजे, विशाल मळेकर, दिनकर नागरगोजे, भरत नागरगोजे, दत्तु पौळ, सतीश पौळ, प्रमोद नागरगोजेंसह आदींची उपस्थिती होती.