महाराष्ट्रात मजुरांना आता 312 रूपये मजुरी मिळणार
बीड, (रिपोर्टर) ः वाढती महागाई पाहता केंद्र सरकारने नुकतेच खासदारांचे वेतन 24 टक्क्यांने वाढवले मात्र दुसरीकडे मजुराचे वेतन वाढवण्याकडे कंजूसपणा केला. महाराष्ट्रामध्ये रोहयोवरच्या मजुरांना फक्त 15 रूपयाची वाढ करण्यात आली. पुर्वी 297 रुपये होते. आता 1 एप्रिलपासून 312 रूपये मजुरांना मजुरी मिळणार आहे. देशात सर्वाधिक मजुरी हरयाणा राज्यात 400 रुपये करण्यात आली. राज्यासह देशात हजारो मजुर रोहयोवर काम करतात. या मजुरांना योग्य मजुरी मिळणे गरजेचे आहे. तुटपूंजी मजुरी वाढवून मजुरांच्या तोंडाला शासनाने पाने पुसण्याची कामे केली.
गावामध्ये मजुरांना काम मिळावे यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत तलाव, सिंचन विहिरी, फळबाग, घरकुल यासह आदी कामे केली जातात. सार्वजनिक आणि वैयक्तीक कामाचा यामध्ये सहभाग आहे. रोहयोवरच्या मजुरांना मजुरी मात्र अत्यंत कमी प्रमाणात दिली जाते. मजुरीचा दर वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळा आहे. रोहयो योजना केंद्र सरकारच्या अंतर्गत राबवली जाते. केंद्र सरकारने महागाईचा विचार करता खासदारांचे वेतन नुकतेच वाढवले. हे वेतन 24 टक्क्याने वाढवले मात्र रोहयोवरच्या मजुरांना तुटपूंजी मजुरी वाढवण्यात आली. महाराष्ष्ट्रात फक्त 15 रूपयाची वाढ करण्यात आली. महाराष्ट्रात पुर्वी 297 रुपये मजुरी होती आता 312 रूपये मजुरी मिळणार आहे. देशात हरयाणा राज्यामध्ये सर्वाधिक 400 रुपये मजुरी आहे. नवीन मजुरीच्या दराची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून करण्यात येणार आहे.