गेवराई (रिपोर्टर): गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथे मस्जिदमध्ये करण्यात आलेल्या जिलेटीन स्फोट प्रकरणातील दहशतवाद्यांवर युएपीए एनएसए अंतर्गत गुन्हा दाखल करावा व सदरील स्फोटाची चौकशी एनआयएकडून करावी, या मागणीसाठी मुस्लिम बांधवांच्या वतीने गेवराई बंदचे आवाहन करण्यात आले, त्या आवाहनाला गेवराईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज गेवराई कडकडीत बंद असून शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथील विजय गव्हाणे व सागडे या दोघांनी येथील मस्जिदमध्ये जिलेटीन स्फोट घडवून आणला. त्याआधी विजय गव्हाणे याने ‘तुमची मस्जिद काढून घ्या, नाहीतर मी उडवून देईल’ अशा प्रकारची धमकी दिली होती. त्याचबरोबर जिलेटीनसह एक व्हिडिओ काढून तो इन्स्टाग्रामवर टाकून दहशत निर्माण केली होती. सदरचा प्रकार हा दहशतवादी आणि आतंकवादाचाच आहे, त्यामुळे या दहशतवाद्यांवर युएपीए, एनएसए अंतर्गत गुन्हा दाखल करावा व सदर प्रकरणाचा तपास एनआयएकडून करावा, या मागणीसाठी आज गेवराई बंदचे आवाहन करण्यात आले होते. सदरचे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची असून बंदमध्ये गेवराईकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सदरच्या निंदनीय घटनेचा जाहीर निषेध केला. गेवराई शहरामध्ये बंद दरम्यान कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ती दारुची नशा नव्हे धर्मांधतेचा विचार
आ. धस, तो दारुड्या नव्हे, आतंकवादीच!
अर्धमसल्यात गव्हाणे आणि सागडे या दोघांनी ज्या पद्धतीने आणि ज्या विचाराने जिलेटीन लावून मस्जिद उडवून देण्याचा प्रयत्न केला, मस्जिदमध्ये स्फोट घडवून आणला ते कृत्य दहशतवादी आणि आतंकवादीच असे असताना आष्टी-पाटोद्याचे आमदार सुरेश धस यांनी बेजबाबदारपणे काल वक्तव्य केले. तो स्फोट त्या लोकांनी व्यक्तिगत कारणातून केला, ते दारुडे आहेत, त्याच्यामागे कोणी मास्टरमाइंड नाहीत, अशी बेताल बडबडही धसांनी केली. परंतु सदरचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. जे लोक तुमची मस्जिद काढा नाहीतर आम्ही उडवून देऊ, अशी धमकी देतात याचाच अर्थ हे नशेत नव्हेतर धर्मांधतेच्या विचारात घडवून आणलेली घयना मानावी लागेल. सुरेश धसांनी घटनास्थळी जावून पाहणी करायला हवी होती, नंतर धसांनी यावर भाष्य केलं असतं तर अधिक बरं झालं असतं, परंतु ज्या पद्धतीने धस बरगळले त्यातून मुस्लिम समाजात आणि अन्य समाजातही संताप व्यक्त केला जात आहे.