बीड, (रिपोर्टर)ः- महाराष्ट्र उष्णतेने होरपळून निघत आहे. 40 च्या पुढे तापमान गेले आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याची पातळी देखिल झपाट्याने कमी होवू लागली. तिव्र उन्हाच्या झळा असतांनाच आज विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली. या पावसामुळे आंब्यासह इतर पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

राज्यात आठवड्यापूर्वी नाशिक, कोकण, विदर्भ , मराठवाड्यात अवकाळीने हजेरी लावली होती. या अवकाळी पावसाने पिकांना फटका बसल्याने शेतकर्यांचे मोठं नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा पारा 40 च्या पुढे गेला आहे. वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर बुलढाणा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. राज्यात नंदुरबारमध्ये सर्वाधिक 46 अंश तापमानाची नोंद झाली आहे. दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता हे कमी दाबाचं क्षेत्र निवळले आहे. मात्र उत्तर विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा असल्याने विदर्भात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव, पालघर या भागात हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत उष्णतेचा पारा वाढला असून 35 अंशांवर जाण्याची शक्यता आहे.
’या’ भागात वादळी वार्यासह पावसाचा इशारा
कोल्हापूर, नागपूर, गोंदिया, वर्धा, परभणी, बीड, सातारा, अमरावती, हिंगोली, भंडारा, गडचिरोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर या भागात वादळी वार्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांचा कडकडाट होऊन पावसाचा अंदाज आहे. या भागात हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नांदेड, लातूर, पुणे, सोलापूर, सिंधुदुर्ग या भागात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.