बीड तापले; तापमान 41.5 अंशांवर
बीड (रिपोर्टर): उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. या हंगामातील सर्वाधिक तापमान 41.5 अंश मागील तीन दिवसांपासून मोजले जात आहे. या उन्हामुळे उष्माघाताचीही शक्यता आहे. आरोग्य विभागाने उष्माघाताच्या रुग्णांवरील उपचारासाठी स्वतंत्र कक्षही सुरु केला आहे. यासह उष्णतेच्या त्रासातून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आलेले आहे.
अलिकडच्या काही उन्हाळ्यांपेक्षा यंदाचा उन्हाळा तीव्र जाणवत आहे. मागील काही दिवसांपासून वाढत्या उन्हामुळे सकाळी 12 वाजेच्या दरम्यानच कायम वर्दळीचे चौक, बाजारपेठा ओस पडत आहे. वाहनचालक आणि विशेषत: दुपारच्या वेळेत बाहेर पडण्याचे टाळत आहेत. या उष्णतेच्या काळात उष्माघात होऊ नये, यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यावा, उष्माघात उपचारासाठी सज्जता ठेवण्याच्या जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या सुचनेनंतर जिल्हा रुग्णालयात कक्ष तयार करण्यात आला आहे.
ही आहेत उष्माघाताची लक्षणे
घाम सुटणे, तहान लागणे, शरीर शुष्क होणे, 100 पेक्षा अधिक ताप, भुक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, बेचैन वाटणे, अस्वस्थता वाटणे, उलटी होणे, अशी याची लक्षणे आहेत.
काय करावे, काय टाळावे?
याबाबत जिल्हा शल्यचिकीत्सक व औषधी शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय राऊत म्हणाले, ‘उन्हात शारिरीक श्रमाची कामे टाळावीत, कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम टाळावे, घट्ट आणि काळ्या रंगांच्या कपड्यांचा वापर टाळावा. तर, शक्यतो पांढरे कपडे वापरावेत, भरपूर पाणी, लिंबू सरबत प्यावे. उन्हात जाण्यापूर्वी जेवन करावे, रिकाम्यापोटी उन्हात जाऊ नये. कान आणि डोक्याचा उन्हापासून बचाव करणे आवश्यक आहे. डोक्याभोवती पांढरा रुमाल गुंडाळावा. गॉगल्स आणि हेल्मेट वापरावे. वृद्धांनी आणि बालकांनी शक्यतो उन्हात बाहरे पडणे टाळावे.
लक्षणे आढळल्यास करा उपाय
रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर सुरु ठेवावे. शरीराचे तापमान कमी करण्यासाठी रुग्णाला बर्फाच्या पाण्याने अंघोळ घालावी. कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आईसपॅक लावावेत, ओआरएस सोल्युशन द्यावे. यानंतर रुग्णांना उपचारासाठी थेट दवाखान्यात न्यावे.सध्या तापमान वाढल्याने काळजी घ्यावी. तसेच सुचवलेल्या उपाययोजना कराव्यात. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्ष तयार करण्यात आला आहे. तज्ज्ञांची नेमणूक तसेच आवश्यक औषध सामुग्री उपलब्ध केली आहे.