गडाला दत्तक घेण्याची पात्रता नाही, तुम्ही मला दत्तक घ्या-मुख्यमंत्री
मिडियावाले बीडच्या वाईट गोष्टी दाखवतात इथे 93 वर्षापासून नारळी सप्ताह होतात.
बीड, (रिपोर्टर)ः-बीड जिल्ह्यातल्या काही वाईट घटना मिडियाचे लोक वारंवार दाखवतात तो त्यांचा अधिकार आहे. परंतू या बीड जिल्ह्यात गेल्या 93 वर्षापासून नारळी सप्ताह होतात. हा जिल्हा संतांचा जिल्हा आहे. वारकर्यांचा जिल्हा आहे, अध्यात्माचा जिल्हा आहे यामुळेच या जिल्ह्यातील सर्व सामान्य माणसांना वाईट गोष्टीविरोधात लढण्यासाठी ताकद मिळते. आता आष्टीपर्यंत पाणी आणलं आहे. अखंड बीड जिल्हा पाणीदार करणार असल्याचे सांगून समुद्रात वाहून जाणारे पाणी लवकरच गोदावरी खोर्यात आणले जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हंटले.गडाला दत्तक घेण्याची माझी लायकी नाही, पात्रता नाही, विठ्ठल महाराज तुम्ही मला दत्तक घ्या आपण सर्वांनी मिळून गडाचा विकास करू, गडावर येणार्या भक्तांचा विकास करू असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घाटशिळ पारगाव या ठिकाणच्या नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात दिला.
ते गहिनीनाथ गडाच्या 93 व्या नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यासाठी घाटशिळ पारगाव या ठिकाणी आले होते. यावेळी व्यासपिठावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आ.सुरेश धस, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आ.नमिता मुंदडा, आ. मोनिका रागळे, शंकर देशमुख, समीर काझी, प्रताप ढाकणे, दादासाहेब मुरकुटे, भिमराव धोंडे, नवनाथ खेडकर, लक्ष्मण हाके यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आज मला मनापासून समाधान आहे, 93 वर्षापासूनच्या सुरू असलेल्या परंपरेत मला यायची संधी मिळाली. संत वामनभाऊ यांचे आशिर्वाद घेण्याचे भाग्य मिळाले. बीड जिल्ह्यात सप्ताहाची परंपरा मोठी आहे. हा संतांचा जिल्हा आहे, हा वारकर्यांचा जिल्हा आहे परंतू मिडीयाचे लोक वारंवार इथल्या वाईट गोष्टी दाखवतात तो त्यांचा अधिकार आहे परंतु या जिल्ह्यात 93 वर्षापासून नारळी सप्ताह होतात. हेही तेवढेच खरे, अध्यात्माच्या ऊर्जेतूनच बीड जिल्हा अनेक अडचणींचा सामना करतो आणि त्याच्यावर यशही मिळवितो. गोपीनाथराव मुंडेंच्या आशिर्वादाने मला वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे या बीड जिल्ह्याचे आणि माझे नाते एक वेगळे झाले आहे. गेल्या वर्षापासून या गडाच्या विकासाचे काम हाती घेतले आहे. गडाला दत्तक घेण्याची माझी पात्रता नाही, विठ्ठल महाराज तुम्ही मला दत्तक घ्या, आपण सर्व मिळून या गडाचा विकास करू, बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा आहे. या जिल्ह्याला पाणीदार करायचे आहे. आष्टीपर्यंत पाणी आणलं, संतांच्या आशिर्वादाने समुद्रात वाहून जाणारे 53 टीएमसी पाणी गोदावरीच्या खोर्यात आणणार आहे. त्या कामाला मंजूर मिळाली आहे. नक्कीच 21 टिएमसी पाण्यापैकी केवळ 7 टिएमसी पाणी हे मराठवाड्याला मिळतं परतु आता कोयना खोर्यातलं 30 टिएमसी पाणी वळण बंधार्यातून बीड जिल्ह्यात आणणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली.संतांचे विचार हे माणूस जोडणारी परंपरा असल्याचे सांगून मला या गडावर बोलविले नाही तरी भक्त म्हणून मी गडावर येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
वामनभाऊंची गादी कडक
त्यांचा वाचा सिध्दी होती-ना.पंकजा मुंडे
दोन महिन्यापुर्वी चाकूर येथील नागरीकांना कार्यक्रमाबद्दल शब्द दिला होता. मात्र आज मुख्यमंत्री येथे येणार म्हंटल्यावर मी त्यांना कार्यक्रमाला येणार नसल्याचे सांगितले. तेव्हा ते नाराज झाले. मात्र पुढच्या वेळेस मुख्यमंत्र्यांना सोबत घेवून कार्यक्रमाला येईल हा शब्द चाकूरकरांना दिला. हा भाग सातत्याने दुष्काळाचा भाग आहे अशा परिस्थितीत सर्व सामान्य माणसं हे भक्ती मार्गाला लागावेत ती अन्यत्र भरकटू नयेत म्हणून संत वामनभाऊंनी सप्ताह सुरू केले. लोकांना अध्यात्माच्या मार्गाला लावले. संत वामनभाऊंची गादी कडक आहे, त्यांना वाचा सिध्दी होती असं म्हणत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांनी हा गड दत्तक घ्यावा असं म्हणत सत्तेशिवाय विकास होत नाही. मी पालकमंत्री असतांना या गडाचा विकास केला. माझ्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी माझ्यापेक्षा जास्त विकास केला आज जरी मी या जिल्ह्याची पालकमंत्री नसले तरी पालक म्हणून मुख्यमंत्र्यांना मागणी घालते हा गडा त्यांनी दत्तक घ्यावा असं ही पंकजा मुंडे म्हणाल्या.