मुंबई : लवकरच पावसाळा सुरु होणार आहे. जेव्हा आपण छत्री पाहतो तेव्हा आपल्या मनात काय विचार येतो? तर छत्रीचं पहिलं काम पावसापासून संरक्षण करणं आणि दुसरं म्हणजे उन्हापासून बचाव करण्यासाठी लोक छत्री वापरतात. पण कल्पना करा जर तुम्ही पावसात तुमची छत्री उघडली आणि त्यातून पाणी गळायला लागलं तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुमच्याकडील छत्री जरी 100 ते 500 रुपयांची असली तरी तुम्ही दुकानदाराला चांगलंच सुनावता. पण जर दोन प्रसिद्ध फॅशन ब्रँड्स मिळून सव्वाएक लाख रुपयांना छत्री विकत असेल पण ज्याचा पावसात काहीही उपयोग नाही. ती पावसापासून संरक्षण करु शकत नाही, असं कळलं तर…अशाच एका छत्रीबद्दल चीनमध्ये सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
जगातील लक्झरी ब्रँड Gucci आणि स्पोर्ट्सवेअर फर्म Adidas चीनमध्ये अशीच छत्री बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. या छत्रीची किंमत तब्बल 11,000 युआन म्हणजे सुमारे एक लाख 27 हजार रुपये आहे. जर पावसापासून संरक्षण करत नसेल तर अशा छत्रीचा काय उपयोग. पावसापासून बचाव करण्यासाठी ही छत्री बनवली नसल्याचं कंपन्यांचं म्हणणं आहे. Gucci या कंपनीचं म्हणणं आहे की, ही छत्री वॉटरप्रूफ नाही उन्हापासून संरक्षण करण्यासाठी किंवा सजावटीच्या वापरासाठी आहे.
या छत्रीबाबत चीनच्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबोवर या छत्रीशी संबंधित पोस्ट व्हायरल झाली आहे. नेटकरी त्याला जोरदार ट्रोल करत आहेत. पुढील महिन्यात ही छत्री चीनच्या बाजारात आणण्याची तयारी सुरु आहे. ही छत्री Gucci आणि Adidas चं संयुक्त कलेक्शन आहे जे विक्रीपूर्वी ऑनलाईन प्रमोट केलं जात आहे. Weibo वर हॅशटॅगसह छत्रीबाबत चर्चा सुरु आहे. त्यात म्हटलं आहे की 11,000 युआनची छत्री विकली जात आहे जी वॉटरप्रूफ नाही.
ट्रेफॉइल डिझाइनपासून बनवलेली छत्री
या छत्रीचे दर उच्च आहेत, पण ती पावसापासून संरक्षण करत नाही, कारण ती वॉटरप्रूफ नाही. कारण ती दिसायला ‘सन अंब्रेला’ आहे. Gucci च्या वेबसाईटनुसार, या सन अंब्रोलामध्ये इंटरलॉकिंग G आणि trefoil डिझाईन आहे. Gucci च्या मते छत्रीचं हॅण्डल लाकडी असून तो जी आकाराचा आहे.
ही छत्री सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. पावसापासून संरक्षण न करणारी ही छत्री एवढी महाग का असाही प्रश्न विचारला जात आहे.
चीनमध्ये महागड्या वस्तूंना मागणी
चीन ही जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि जगभरातील लक्झरी ब्रँड्सची महत्त्वाची बाजारपेठ आहे. कन्सल्टन्सी फर्म बेन अँड कंपनीच्या म्हणण्यानुसार, चीनमध्ये लक्झरी वस्तूंची विक्री गेल्या वर्षी 36 टक्क्यांनी वाढली आहे. येत्या तीन वर्षांत चीन ही चैनीच्या वस्तूंसाठी जगातील सर्वात मोठी बाजारपेठ बनणार असल्याचा अंदाज फर्मने व्यक्त केला आहे. चीनमध्ये मध्यमवर्ग झपाट्याने वाढत आहे आणि त्यामुळे चैनीच्या वस्तूंची मागणीही वाढत आहे