नवनियुक्त कलेक्टरांच्या नव्या मोहिमेने सर्वसामान्य सुखावला, कामचुकार अधिकारी धास्तावले
ग्रामसेवक, तलाठी, नायब तहसीलदार पासून सर्वच विभागांच्या अधिकार्यांना आता दाखवावं लागणार हा सुर्य आणि हा जयद्रथ

बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज जनहिताचा सर्वोत्कृष्ट निर्णय घेत जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी जॉन्सन यांनी थेट दरबार भरवला. दरबाराची माहिती नसताना शंभरपेक्षा अधिक नागरिकांनी थेट जिल्हाधिकार्यांची भेट घेतली आणि आपआपले प्रश्न मांडले. यात बहुतांशी बंद पडलेल्या सोसायट्यांचे ठेवीदार असल्याचे दिसून आले. ज्ञानराधाची फाईल मागवून घेत त्यावर लवकरच भाष्य करेल, असे कलेक्टरांनी सांगितले. आठवड्यातल्या सोमवार, मंगळवार आणि गुरुवार रोजी जॉन्सन यांचा हा जनता दरबार भरला जाणार आहे. त्यामुळे कामचुकार अधिकार्यांचे पितळ आता उघडे पडणार आहे. एकीकडे जॉन्सन यांच्या दरबाराने जनतेत आनंद आहे तर अधिकार्यांचे धाबे दणाणले आहेत.
नुकतेच बीडमध्ये डेरेदाखल झालेले जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन हे अॅक्शन मोडवर आल्याचे पहावयास मिळते. काल त्यांनी भरदुपारी कार्यालयात न बसता कामखेडा आणि वासनवाडी या भागात जावून फार्मर आयडीबाबत माहिती देत ते आयडी काढण्याचे आवाहन केले. दुसरीकडे विमानतळाची नियोजीत जागेची पाहणी केली. पाठोपाठ आज जॉन्सन हे खुर्ची टाकून हॉलमध्ये बसले. येणार्या प्रत्येक नागरिकाचे म्हणणे, तक्रारी आणि कामे ऐकून घेतले. जनता दरबाराची लोकांना माहिती नसताना तब्बल शंभरपेक्षा अधिक लोकांचे म्हणणे आणि त्यांच्या तक्रारी जाणून घेत त्याचे निवारण तात्काळ करण्याचा प्रयत्न जिल्हाधिकार्यांकडून करण्यात आला. आज सर्वाधिक ज्ञानराधाचे ठेवीदार जिल्हाधिकार्यांपर्यंत पोहचल्याचे सांगण्यात येते.

जिल्हाधिकार्यांनी याबाबत अधिक माहिती घेऊन बाकी काय ते सांगितले जाईल, असे म्हटले. जॉन्सन आता आठवड्यातून सोमवार, मंगळवार आणि गुरुवार रोजी जनता दरबार घेणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न जिथले तिथे मार्गी लागण्याची आशा आहे. सर्वसामान्य नागरिकांचे अधिक काम हे ग्रामसेवक, तलाठी, तहसील कार्यालय इथे मोठ्या प्रमाणावर असतात. काम छोटे असते, मात्र अधिकारी, कर्मचारी कामात कुचराई आणि दिरंगाई करत असल्याने होत नव्हते, आता मात्र कामचुकार अधिकार्यांना जॉन्सन हे हा सुर्य आणि हा जयद्रथ दाखवण्यास भाग पाडतील, त्यामुळे अधिकारी, कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत. जॉन्सन यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर सध्या तरी सर्वसामान्य खुश असल्याचे दिसून येते.