
मुंबई (रिपोर्टर): पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच या मृतांमधील प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. संतोष जगदाळे यांच्या कन्या असावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहलगाम हल्ल्यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर राज्यातीलस सहा मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. तसेच प्रत्येक कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कुटुंबांच्या शिक्षण, रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार आहे. या आधी असावरी जगदाळेंना पुण्यातील डी वाय पाटील संस्थेमध्ये नोकरी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता त्यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा विशेषाधिकार वापरून मृतांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याता निर्णय घेतला आहे.