
बीड, (रिपोर्टर) ः बीड जिल्ह्यातील अनेक वाड्या, वस्त्या, गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावू लागली. पाणी पुरवठा करण्यासाठी काही विहिरी अधिगृहीत करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 23 गावे व 51 वाड्यासाठी 33 टँकर मंजूर करण्यात आले असून या टँकरव्दारे सदरील गावांना पाण्याचा पुरवठा केला जात आहे.
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक गावात पाण्याची टंचाई जाणवू लागली. गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाई भेडसावत असून टँकरसाठी त्या-त्या पंचायत समिती कार्यालयात प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. जिल्ह्यातील 23 गावे आणि 51 वाड्या टंचाईग्रस्त आहेत. त्या गावात पाणी नसल्यामुळे सदरील गावात 33 टँकरव्दारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. आगामी काळात आणखी गावात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. काही विहिरी पिण्याच्या पाण्यासाठी अधिगृहीत करण्यात आल्या आहेत. यावर्षीचा उन्हाळा अधिकच जड गेला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. अनेक धरणांनी तळ गाठला. काही धरणात तर काही दिवस पुरेस एवढा पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. वेळेवर पाऊस पडला तर पाण्याची टंचाई अधिक जाणवणार नाही.