
मंत्री छगन भुजबळ यांना १०० कोटींच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी लक्ष्य करणारी भाजपाची एक जुनी पोस्ट व्हायरल झाली आहे.
मुंबई (रिपोर्टर)
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
पक्षाचे आमदार व ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा आज अखेर शपथविधी पार पडला. छगन भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आणि राजकीय कलगीतुऱ्याला सुरुवात झाली. छगन भुजबळ आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळात एकत्र काम करताना दिसणार आहेत. मात्र, भाजपानंच २०१९ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना छगन भुजबळांवर केलेल्या आरोपांच्या पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या आहेत.
अशीच एक पोस्ट थेट महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत एक्स हँडलवर शेअर करण्यात आली होती.
छगन भुजबळांचा शपथविधी
काही दिवसांपूर्वी बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून त्यांच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कारभार स्वतः अजित पवारांकडेच होता. आता त्यांच्याजागी छगन भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. भुजबळांनी स्वतः कोणतंही खातं मिळालं तरी चालेल, अशी जाहीर भूमिका मांडली असली, तरी त्यांना मुंडेंचंच खातं दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र टीमनं शेअर केलेली पोस्ट व्हायरल होऊ लागली आहे.
विरोधी पक्षात असताना भाजपाचा भुजबळांना विरोध !
२०१९ मध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत होतं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष सरकारमध्ये होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताफ्यातून छगन भुजबळ हेदेखील मंत्री म्हणून सरकारमध्ये होते. मात्र, तेव्हा भारतीय जनता पक्षाकडून छगन भुजबळांना महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी लक्ष्य करण्यात येत होतं. याचदरम्यान महाराष्ट्र भाजपाने ही पोस्ट केली होती.
काय आहे पोस्टमध्ये?
“महाराष्ट्र सदन घोटाळा… राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा केला होता. या प्रकरणात त्यांचे पुत्र पंकज व पुतण्या समीर भुजबळदेखील आरोपी होते.
#विसरलानाहीमहाराष्ट्र #आघाडीबिघाडी”, असं या पोस्टमध्ये भाजपानं नमूद केलं होतं. ९ एप्रिल २०१९ रोजी संध्याकाळी ४ वाजून ४६ मिनिटांनी भाजपानं ही पोस्ट केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा केला होता.
नवीन महाराष्ट्र सदनची किंमत १०० कोटींपेक्षा अधिक वाढवण्यात आली.
ईडीकडून करण्यात आलेल्या चौकशीत भुजबळ यांच्या शैक्षणिक संस्थेत अनेक गैरव्यवहार व कुटुंबीयांकडे २६०० कोटी रुपयांची बेनामी संपत्ती निदर्शनास आली होती.
या प्रकरणात त्यांचे पुत्र पंकज व पुतण्या समीर भुजबळ देखील आरोपी होते.
असे मुद्दे नमूद करण्यात आले आहेत.
भुजबळांच्या शपथविधीवर दमानियांचं टीकास्र
दरम्यान, छगन भुजबळांच्या शपथविधीनंतर त्यावरून महायुती सरकारवर टीका केली जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्याचाच उल्लेख करत थेट देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. “वाह फडणवीस वाह, म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जाणार? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमचं काहीच वाकडं करू शकत नाही? असा काय नाईलाज आहे? की सभ्य माणसं मिळत नाहीत राजकारणात?” असा सवाल अंजली दमानियांनी केला आहे.ReplyForwardAdd reaction