शालेय शिक्षण समितीचा सवाल : महागाईपासून सरकार अनभिज्ञ
पात्रूड (रिपोर्टर): समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पुरविल्या जाणार्या गणवेशाकरिता प्रतिविद्यार्थी प्रती गणवेश केवळ 300 रुपये प्रमाणे निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार असून वाढत्या महागाईच्या काळात 300 रुपयांत गणवेश कसा खरेदी करायचा, असा यक्ष प्रश्न मुख्याध्यापकांना भेडसावू लागला आहे.समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1 ली ते 8 वी च्या सर्व विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी दोन गणवेश मोफत उपलब्ध करून दिले जातात.
त्यासाठी शासनाकडून शाळा व्यवस्थापन समितीला प्रतीविद्यार्थी प्रतीगणवेश 300 रुपये प्रमाणे निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यातही आता एक गणवेश स्काऊटगाईड पद्धतीचा देण्याची अट शासनाने घातलेली आहे. त्यामुळे या गणवेशासाठी कापड व शिलाई सुद्धा अधिक लागणार आहे. वाढती महागाईच्या काळात कापड व शिलाईचे भाव लक्षात घेता तीनशे रुपयात गणवेशासाठीचे कापड व शिलाईचा खर्च भागविणे शक्य होत नसल्याची भावना मुख्याध्यापक बोलून दाखवत आहे. इयत्ता 1 ली व इयत्ता 8 वी च्या विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी सारखाच निधी मिळतो. त्यातही 7 वी 8 वीच्या विद्यार्थ्यांना मुलांना फुलपँट व मुलींना सलवार कमीज, असा गणवेश द्यावा लागतो, त्यासाठी कापड व शिलाई खर्च ही जास्त येतो.