आरटी देशमुख यांच्या अस्थिविसर्जनासाठी उपस्थिती ;
बीड (रिपोर्टर)-
माजी मंत्री तथा परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे बुधवारी नाशिकमध्ये धार्मिक विधींसाठी दाखल झाले होते. माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या अस्थिविसर्जनासाठी ते नाशिकच्या पवित्र रामकुंडावर उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच मुंडे यांनी इगतपुरी येथे विपश्यना केली होती, त्यानंतर आता ते धार्मिक कार्यक्रमांसाठी नाशिकमध्ये आले आहेत.
माजी आमदार आर. टी. देशमुख यांचे नुकतेच औसा तालुक्यातील बेलकुंडजवळ झालेल्या एका भीषण अपघातात निधन झाले होते. २६ मे रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ते तुळजापूरहून औसा, लातूर मार्गे बीडकडे आपल्या फॉर्च्युनर गाडीने जात असताना राष्ट्रीय महामार्गावर बेलकुंड येथील उड्डाणपूल उतरत असताना हा अपघात घडला. जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते आणि चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडीने पाच ते सहा वेळा पलटी खाल्ली, ज्यामुळे देशमुख गाडीतून बाहेर फेकले गेले आणि गाडी पूर्णपणे त्यांच्यावर पडली, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी रामकुंडावर आर. टी. देशमुख यांच्या अस्थिविसर्जनाचे आणि संबंधित धार्मिक विधी पार पडले. या विधींसाठी धनंजय मुंडे यांनी विशेष उपस्थिती लावली. देशमुख यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोक व्यक्त करण्यात आला होता. अस्थिविसर्जन आणि धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर धनंजय मुंडे रामकुंडावरून रवाना झाले.