अंबाजोगाई (रिपोर्टर) शहरापासून काही अंतरावर असलेल्या वानटाकळी येथे आज सकाळी खळबळजनक प्रकार उघडकीस आला. एका विवाहित महिलेच्या पोटात चाकु भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना घडली. सदरच्या महिलेची हत्या नेमकी कोणी केली? आणि का केली? हे अद्याप समजू शकले नसले तरी घटनेची माहिती कळताच घटनास्थळी अंबाजोगाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांनी धाव घेतली आहे. या घटनेने वानटाकळीत खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वानटाकळी तांडा येथील 35 वर्षीय अनिता वैजिनाथ राठोड या महिलेचा सकाळी तिच्या पोटात चाकू भोसकून खून करण्यात आला. ती रक्ताच्या थारोळ्यात मिळून आल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. अनिता राठोड यांची हत्या का करण्यात आली? याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र गावातील लोकांच्या सांगण्यानुसार किरकोळ कारणातून अनिताचा खून झाल्याचे सांगण्यात येते. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सदरची घटना घडली. अनिता राठोड यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य पाहून अंबाजोगाई पोलिसांनी घटनास्थळ गाठत या प्रकरणाचा शोध सुरू केला आहे. अनिताला कोणी आणि का मारले? हे अद्याप माहित नसल्याच पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांनी सांगून लवकरच या प्रकरणातील आरोपींना अटक करू, असे त्यांनी सांगितले.