
बीड (रिपोर्टर): धनादेश वटला नसल्याने निखिल पवार यास सहा महिने तुरुंगवास व तीन लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. सदरील हा दंड बीड येथील न्यायालयाने ठोठावला.
फिर्यादी श्रीधर बाबासाहेब सांगळे यांच्या मालकीचे पुष्पक प्लायवुड अॅण्ड हार्डवेअरचे दुकान आहे. हे दुकान पं.स. कार्यालयासमोर असून निखिल लहू पवार (रा. संत नामदेवनगर, धानोरा रोड बीड) याने जानेवारी 2019 मध्ये फर्निचरचे काम करण्यासाठी 3 लाख रुपयांचे साहित्य खरेदी केले होते. आरोपीने फिर्यादीस 50 हजार रुपये रोख दिले आणि उर्वरित 2 लाख 50 हजार रुपये दीड महिन्याच्या आत देतो, असे आश्वासन दिले. आरोपी व फिर्यादी यांची जुनी ओळख असल्याने फिर्यादीने आरोपीस पैशाची मागणी केली.
आरोपीने फिर्यादीस 2 लाख 50 हजार रुपयांचा धनादेश दिला. सदरचा धनादेश कॅश करण्यासाठी बँकेत जमा केला मात्र तो वटला नाही. फिर्यादीने आरोपीस धनादेशाची रक्कम मागणी करण्याकामी नोटीस पाठविली मात्र आरोपीने फिर्यादीस रक्कम दिली नाही. त्यानंतर फिर्यादीने आरोपीविरुद्ध बीड येथील न्यायालयात कलम 138 नुसार दावा दाखल केला. सदरचे प्रकरण प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जोशी यांच्या कोर्टात चालले. या प्रकरणी न्यायालयाने आरोपी निखिल पवार यास दोषी ठरवून सहा महिने तुरुंगवास व तीन लाख रुपये दंड ठोठावला आहे. सदर प्रकरणामध्ये फिर्यादी श्रीधर सांगळे यांच्या मार्फत बीड येथील अॅड. शेख सादेक यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. शेख असलम आरेफ व शेख आसेफ यांनी सहकार्य केले.