
कामाचा घेतला आढावा
सीईओ म्हणाले, कामचुकार कर्मचार्यांची गय केली जाणार नाही

बीड (रिपोर्टर): जिल्हा परिषदेचे नवनियुक्त सीईओ जतीन रहेमान यांनी आज दुपारी बीड पंचायत समिती कार्यालयाला अचानक भेट दिली. सीईओ अचानक कार्यालयात आल्याने सर्व कर्मचार्यांची एकच तारांबळ उडाली. सीईओंनी कार्यालयात विविध कामांचा आढावा घेतला. जे कामचुकार कर्मचारी आहेत त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला. कोण-कोणती कामे सुरू आहेत याबाबतची माहिती देखील त्यांनी अधिकार्यांकडून जाणून घेतली.
तीन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे सीईओ जतीन रहेमान यांनी पदभार घेतला. पदभार घेताच त्यांनी आपल्या कामाचा धडाका सुरु केला. बीड पंचायत समितीबाबत अनेक तक्रारी होत्या. आज दुपारी रहेमान यांनी अचानक पंचायत समिती कार्यालयाला भेट दिली. सीईओ कार्यालयात आल्याने उपस्थित कर्मचार्यांत एकच खळबळ उडाली होती. त्यांनी कार्यालयात बसून विविध कामांबाबतचा आढावा घेतला. रोजगार हमीची किती कामे सुरू आहेत, किती पेंडींग आहेत, घरकुलाचे किती कामे झाले आहेत, किती बाकी आहेत यासह इतर माहिती जाणून घेतली. जे कर्मचारी कामात कुचराई करतात त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. जे कर्मचारी आज गैरहजर होते त्यांना नोटीसा बजावण्यात येणार आहेत. सीईओ यांच्या समवेत गटविकास अधिकारी कांबळे, आंधळे यांच्यासह आदी कर्मचारी, अधिकार्यांची उपस्थिती होती. बीड पंचायत समिती नंतर ते गेवराई पंचायत समितीला भेट देणार असल्याचे सांगण्यात येते.
कर्मचार्यांना शिस्त लावण्यासोबत वेळेत काम करून घेण्याचा माझा कल
बीड पंचायत समितीमध्ये नरेगाच्या कामकाजामध्ये आणि कामाचे मस्टर काढण्यामध्ये नियमितता दिसत नाही. त्याबाबत एक नवीन अद्यावत फॉर्मेट तयार करून या कामाचे वेळेत मस्टर काढण्यात येणार आहे. सांख्यिकीय अधिकारी आणि इतर विभागाच्या सर्व विस्तार अधिकार्यांची जबाबदारी निश्चित करून वेळेत कामे झाले पाहिजे याबाबतच्या सूचना मी आज कर्मचार्यांना दिल्या आहेत. पंधरा दिवसा या कर्मचार्यांना शिस्त लागली नाहीतर कामचुकार कर्मचार्यांवर कारवाई करण्यात येईल, सोबतच बीड पंचायत समितीतील रिक्त पदांबाबतची माहिती घेऊन ही पदे सरकारकडून कशी लवकरात लवकर भरली जातील, याबाबत लक्ष देणार आहे.






