
गावकर्यांची एसटी महामंडळाकडे मागणी
बीड (रिपोर्टर): बीड ते कवडगाव मार्गे पिंपळनेर-सुर्डी मुक्कामी बस सुरू करण्यात यावी, अशी मागणी गावकर्यांनी विभागीय नियंत्रक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. मुक्कामी बस नसल्याने गावकर्यांची गैरसोय होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
वडवणी तालुक्यातील कवडगाव बु. हे पाच हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावात बस चालू नाही, रस्ता खराब असल्यामुळे बस बंद करण्यात आली होती. मात्र बीड ते कवडगाव दरम्यान (पिंपळनेर-सुर्डी-मोरेवाडी फाटा) रस्ता डांबरीकरण करण्यात आलेला आहे. त्यामुळे या मार्गावरून बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी गावकर्यांनी विभागीय नियंत्रक दुसाणे मॅडम यांच्याकडे केली आहे. तसे निवेदन कवडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आले आहे.







