
भविष्य आणि भवितव्याची वाट म्हणून तुम्ही आम्ही शिक्षणाकडे पाहतो, जो शिकेल तो वाचेल, वाचाल तर वाचाल अशा बिरूदावली मिरवतो. नव्हे नव्हे तर सोळाव्या शतकात ‘आम्हा घरी धन, शब्दांची शस्त्र, शब्दची अस्त्र’ असे संतही म्हणून गेले. म्हणूनच शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. महत्त्व असावं परंतू आज ज्या काही महत्त्वकांक्षा वाढत चालल्या आहेत आणि त्या महत्त्वकांक्षेतून मुलांच्या डोक्यावर जे अपेक्षांचं ओझं टाकलं जात आहे, ते अन्यायकारक म्हणण्यापेक्षा तुघलकी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, होय तुघलूकी एवढ्यासाठीच विद्यार्थ्यांच्या अंगचे गुण ओळखण्यापेक्षा पालक स्वत:च्या अपेक्षा विद्यार्थ्यांवर थोपतात म्हणून आम्ही त्याला अन्यायकारक आणि तुघलकी म्हणतो. एकीकडे शाळेमध्ये भाषा कुठल्या शिकवायच्या, कुठल्या भाषेची सक्ती करायची यावर सत्ताधारी आणि विरोधक स्वत:चा इगो गंडस्थळासारखा सांभाळत असतांना दुसरीकडे महाराष्ट्रात डोकं सुन्न करून टाकणारी घटना घडते, निटच्या परिक्षेमध्ये व्यवस्थित मार्क आले नाहीत म्हणून मुख्याध्यापक असलेला व्यक्ती आपल्या मुलीला मार मार मारतो अन् त्यामध्ये 12 वीत शिकणार्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू होतो. हा मृत्यू नव्हे तर फाजील अपेक्षाने घेतलेला बळी म्हणावा लागेल. पालकांनी मुलांच्या शिक्षणाकडे नफ्याची गुंतवणूक म्हणून न पाहता त्या शिक्षणाकडे मुलाच्या भविष्याची वर्तवणूक म्हणून पाहितलं तर अधिक बरं होईल.
अपेक्षांचा मुख्याध्यापक
होण्यापेक्षा मुलांच्या अंगी असलेल्या गुणातून मुलांचे भविष्य जो उज्वल करेल तो आज मितीला मुलाचा बाप म्हणण्यापेक्षा तो त्या मुलासाठी कुलगुरू ठरेल. सांगतलीतल्या आटपाडी तालुक्यात असलेल्या नेलकरंजी गावातील रहिवाशी धोंडीराम भोसले हे तेथील एका संस्थेमध्ये मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. गेल्या चार दिवसांपूर्वी मुलीला मार्क कमी पडले म्हणून बाप लेकीमध्ये तु तू मै मै झाली, मुलीने ‘पप्पा तुम्हालाही मार्क कमीच पडत होते, तुम्ही कुठं कलेक्टर झालात’ असं म्हटलं. तेव्हा मुख्याध्यापक असलेल्या धोंडीराम भोसलेंना राग आला आणि त्यांनी खुंट्याने मुलीला बेदम मारहाण केली. सकाळी उठल्या उठल्या भोसले हे योग दिन असल्याने योगासाठी गेले. मात्र रात्रीच्या मारहाणीत जखमी झालेली त्यांची मुलगी साधना ही मुर्छीत पडली होती, सकाळी पाहितलं तेव्हा तिला दवाखान्यात नेहण्यात आलं. डॉक्टरांनी तपासलं, दुर्दैवाने साधनाचा मृत्यू झालेला होता. ही घटना बातमी म्हणून वाचाल आणि सोडून द्याल, परंतू या बातमीतून आजच्या स्पर्धेपेक्षा विद्यार्थी आणि पित्याच्या मनातली चलबिचल, पित्याची राक्षशी अपेक्षा स्पष्टपणे दिसून येते. उच्चशिक्षित असलेल्या मुख्याध्यापक पदावरच्या व्यक्तीकडून केवळ मार्क कमी पडले म्हणून तो जर लेकीला मृत्यूच्या दारात नेहून टाकत असेल तर
शिक्षणाची खरी गरज कोणाला?
हा प्रश्न विचारावाच लागेल. आम्ही दोन दिवसांपासून या घटनेवर विचार करत आलो आहोत. आपल्या मुलाच्या अंगात कुठले गुण आहेत त्याची आवड काय? तो डॉक्टर होण्यापेक्षा त्याचा खेळामध्ये रस आहे का? अन्य कुठल्या गोष्टीमध्ये रस आहे का? तो चित्र चांगलं काढतो का? त्याचं गायन चांगलं आहे का? यावर पालक म्हणून आम्ही कधी विचार करणार आहोत का? परंतू नाही आम्हाला एक तर डॉक्टर होयचयं, इंजिनिअर होयचयं, एसपी आणि कलेक्टर होयचयं. नक्की यासाठी प्रयत्न होणे, मेहनत करणे ही अपेक्षा करणं चुकीचे नाही परंतू एखाद्या व्यक्तीला तिकडे जायचेच नसेल तर त्याला हाणून मारून तिकडे घेवून जाणे कितपत योग्य हेही तपासलं पाहिजे. पालकांच्या मनात अपेक्षांची मानसिकता येते कुठून? हा प्रश्न जेव्हा पडतो का तेव्हा बर्याचदा पालकांना एखाद्या क्षेत्रात करिअर करण्यात अपयश आलेलं असतं मग ते पालक आपली इच्छा, आपले स्वप्न मुलाने पुर्ण करावेत अशी आशा बाळगून ते मुलांकडून करून घेण्यास प्रयत्न करतात. परंतू इथं मुलाची क्षमता काय? त्याची आवड काय? हे तपासले जाते का? खरं पाहिलं तर मुलांवर सरसकट या गोष्टी लादल्या जातात. अनेकवेळा पालकांना असं वाटतं, मेडिकल, इंजिनिअर हा गरीबीतून सुटण्याचा मार्ग आहे त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर गुंतवणूक करायची. तुम्ही पाहतायं अलीकडे 11 वी, 12वी चे कॉलेज अक्षरश: ओस पडले तर दुसरीकडे खाजगी कोचिंग क्लासेस ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे स्पर्धा परिक्षेंना तोंड देताना मुलांना नाकी नऊ येवू पाहत आहेत.
इच्छेची साधना
नक्कीच हवी. ज्या मुख्याध्यापक बापाने आपल्या मुलीचे साधना ठेवले, त्याच बापाकडून जेव्हा अपेक्षांचा मुख्याध्यापक होत साधनाच्या मृत्यूस तो कारणीभूत ठरतो तेव्हा अशा अपेक्षांच्या मुख्याध्यापकांना आमचे छोटे छोटे प्रश्न आहेत. सचिन तेंडूलकरचे शिक्षण काय? धिरूभाई अंबानी यांनी कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये डिर्गी घेतली? तिकडे अमिर खान, शाहरुख खान यांचेही शिक्षण बघा, अरे हे लोकं जगजेते आहेत ना! पालकांनी खरं पाहितलं तर स्वत:ला आवरायला हवं, स्वत:च्या अपेक्षांना वळसा घालायला शिकायला हवं, आपलं मुल ज्या क्षेत्रात तरबेज आहे, त्या क्षेत्रात त्याला नक्कीच जावू द्यायला हवं, तुम्हाला डॉक्टर होता आलं नाही म्हणून मुलाला डॉक्टर करणार असाल तर तो होईलच हे सांगणे कठीण, तुमच्या अपेक्षांमुळे मुलांच्या मनामध्ये न्युनगंडतेबरोबर आत्महत्येसारखे विचार येतात ना तेव्हा हातचंही गेलं अन् पदरचंही गेलं अशी वेळ येते. म्हणूनच शिक्षणाकडे गुंतवणूक म्हणून पाहण्यापेक्षा शिक्षण हे चांगल्या वर्तवणूकीसाठी आपल्या लेकरांना शिकवायचं आहे, या भुमिकेत पालकांनी राहायला हवं, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देताना त्याच्या आवडीला, त्याच्या इच्छेला अनन्य साधारण महत्त्व द्यायला हवं, तेव्हाच इच्छेची साधना सार्थकी लागेल आणि अपेक्षांचा मुख्याध्यापक राक्षशी वृत्तीचा राहणार नाही.
ReplyReply allForwardAdd reaction







