
2014 पासून थांबली शिक्षक-शिक्षकेतर भरती :
समायोजनही रखडले, रिक्तपदांमुळे शैक्षणिक संकट
खतीब एजाज
पात्रुड:/शिक्षकांची भरती 2014 पासून थांबली, शिवाय यादरम्यानच्या काळात हजारो शिक्षक निवृत्त झाले. असे असतानाही रिक्त जागा भरल्या गेलेल्या नाहीत. परिणामी, ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पदे रिक्त आहेत.
ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये आज गणित, विज्ञान, यासारखे महत्त्वाचे विषय शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्या शाळांतील मुख्याध्यापकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच, काही शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारीही रिक्त आहेत. दरम्यान, काही काही ठिकाणी अतिरिक्त शिक्षक असल्याचेही आढळते. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या समायोजनाचा प्रश्न अधांतरी असून, जिथे गरज आहे, तिथे शिक्षक नाहीत आणि जिथे गरज नाही, तिथे शिक्षक जास्त आहेत. या परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जावर मोठा परिणाम होत असल्याचे आज चित्र आहे.सध्या ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या काही अतिरिक्त शिक्षकांना वेगवेगळ्या मार्गांनी शहरातील मोठ्या शाळांमध्ये समायोजित करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शिक्षक ग्रामीण भागात रुजू होण्यास इच्छुक नाहीत. याचा परिणाम
असा झाला आहे की, ग्रामीणमधील खासगी अनुदानित शाळांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्रात पहिल्या वर्गापासून हिंदी विषय अनिवार्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या विषयावरून राजकीय वातावरण तापले आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच खरे प्रश्न दुर्लक्षित राहात आहेत. त्यामुळे खरी गरज आहे ती पुरेसे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्यांची, मात्र दुखणे पायात, पण पट्टी डोक्यावर बांधली जात आहे, अशी सध्याची परिस्थिती आहे.
खाजगी शाळांची फी भिडली गगनाला
जिल्हा परिषद शाळा आणि खाजगी अनुदानित मराठी शाळांमध्ये गरीब व सामान्य कुटुंबातील मुले शिकतात. त्यांच्या पालकांची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे ते महागड्या कॉन्व्हेंट शाळा किवा तालुका मुख्यालयातील खाजगी इंग्रजी शाळांमध्ये मुलांना शिकवू शकत नाहीत, कारण तिथल्या फी भरल्यास घरखर्च अडचणीत येतो. त्यामुळे अशा पालकांना पर्यायच नसल्याने आपल्या मुलांना गावातील शाळांमध्ये शिकवावे लागते. मात्र, या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, सुविधांचा अभाव, अशा कारणाने गरीब विद्यार्थ्यांचे नुकसानच होते आहे.







