बीड, (रिपोर्टर)ः- मराठवाड्यामध्ये अजूनही दमदार पाऊस झाला नाही. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली. गेल्या दोन तीन दिवसामध्ये मध्यम आणि तुरळक स्वरूपाचा पाऊस पडल्यामुळे पिकांना काही प्रमाणात जिवदान मिहाळे. हा पाऊस जिल्ह्यात नाही तर तालुक्या पुरताच पडला आहे. रात्री बीड तालुक्यासह इतर ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी पडल्या. आष्टी, पाटोदा, केज, व गेवराईचा काही भागासह इतर ठिकाणची पिके सुकू लागली आहेत. जिल्ह्यात या वर्षी सोयाबीनची सर्वाधिक लागवड झाली या नंतर कापसाची लागवड झालेली आहे.
बीड जिल्ह्यामध्ये खरीपाचे 8 ते 8.50 लाख क्षेत्र आहे. यात सर्वाधिक पेरा पुर्वी कापसाचा होत होता. मात्र गेल्या तीन ते चार वर्षापासून कापसाचे क्षेत्र घटू लागले. सोयाबीनचा सर्वाधिक पेरा जिल्ह्यात होत आहे. यावर्षी तीन ते साडेतीन लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड झाली तर 2 ते 2.50 लाख हेक्टरमध्ये कापसाची लागवड झाली. इतर क्षेत्रात मुग, तुर, बाजरी, सुर्यफुल, भुईमुगाची लागवड करण्यात आली. जुन महिन्या चांगला पाऊस पडला. मात्र जुलै महिन्यात पावसाने दडी मारली. गेल्या 30 ते 35 दिवसापासून मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस झालेला नाही. पिके जोमदार आली पण पाण्याविना त्यांची वाढ खुंटू लागली. काही ठिकाणी पिके सुकू लागली आहेत. शेतकरी दररोज पावसाची वाट पाहत आहे. गेल्या दोन तीन दिवसाच्या कार्यकाळत जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी पडल्या आहेत. यापावसामुळे पिकांना जिवदान मिळाले असले तरी मोठा पाऊस पडला तर पिके चांगली येवू शकतात. पावसाचे प्रमाण कमी असल्याने मराठवाड्यातील धरणे अजुनही कोरडे आहेत. काही बोटावर मोजण्या एवढच्या धरणात या पुर्वीच्या पावसामुळे पाण्याचा साठा जमा झाला त्यानंतर पाऊस झाला नसल्याने धरणे रिकामी आहेत.









