सहा महिन्यात बीड जिल्ह्यात 14 लाचखोर पकडले
बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयामध्ये सर्व सामान्यांची कामे पैसे दिल्याशिवाय होत नाहीत. पैसे दिले की भ्रष्ट अधिकारी कर्मचारी कामे करतात. सामान्यांना छळणार्या आणि पैसाशिवाय काम न करणार्या भ्रष्ट कर्मचार्यांना काही लोक लाचलुचपत मध्ये टाकून त्यांना चांगलीच अद्दल घडवत असतात. गेल्या सहा महिन्यात बीड जिल्ह्यात 14 लाचखोर कर्मचार्यांना पकडण्यात आले. लाचखोर कर्मचार्यावर कारवाई होत असतांनाही इतर लाचखोर यातून कोणताही बोध घेत नाहीत, लाचेची मागणी करणे सुरूच असते. सर्वाधिक लाचखोर महसूल आणि पोलीस विभागात असल्याचे समोर आले आहे.
बीड जिल्ह्यातील जि.प., पं.स., न.प., तहसिल यासह इतर कार्यालयात सर्व सामान्यांची नेहमीच कामे असतात. कर्मचार्यांना लठ्ठ पगार असतांना ते लाच घेण्यास मागे पुढे पाहत नाहीत. अगदी किरकोळ कामांसाठी पैसे घेतले जातात. शिवायापासून ते वरिष्ठ अधिकारी पैसे घेतल्यानंतरच कामे करतात. काही बोटावर मोजण्याएवढेच कर्मचारी इमाने इतबारे काम करतात. लाचखोरांना अद्दल घडविण्यासाठी काही नागरीक त्यांना लाचलुचपत विभागाचा हिसका दाखवत असतात. गेल्या सहा महिन्याच्या कार्यकाळात जिल्ह्यात 14 लाचखोर कर्मचार्यांना पकडण्यात आले आहे. लाचखोरीचे प्रमाण दिवसे दिवस वाढू लागले. सर्वाधिक लाचखोर महसूल आणि पोलीस प्रशासनामध्ये असल्याचे समोर आलेले आहे.








