
सरकारी पक्षाकडून ड्रॉफ्टचार्ज, बारा ते तेरा आरोप निश्चित करण्याची विनंती तर दोषीमुक्तीसाठी कराड उच्च न्यायालयात धाव घेणार
बीड (रिपोर्टर): मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली तेव्हा या सुनावणीत वाल्मिक कराड याचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्याचबरोबर अन्य आरोपींनी दोषमुक्तीबाबत अर्ज केला असून त्याला सरकारी पक्षाकडून जोरदार विरोध करण्यात आला आहे. यावर 4 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे वाल्मिक कराड यांचे वकील विकास खाडे यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.
मागील झालेल्या सुनावणीत वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर आणि संपत्ती जप्तीबाबत युक्तीवाद झाला होता. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी त्याला विरोध केला होता. न्यायालयाने दोषी बाजुने युक्तीवाद ऐकल्यानंतर त्यावरील निर्णय राखून ठेवला होता. आज यावर सुनावणी झाली. या वेळी वाल्मिक कराडने केलेल्या दोषीमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. तसेच वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीचा निर्णय राखून ठेवला. न्यायालयामध्ये नेमकं काय झालं, याबाबत बोलताना अॅड. उज्ज्वल निकम म्हणाले, वाल्मिक कराडने संतोष देशमुखांच्या खटल्यातून मला दोषमुक्त करावं याबाबत अर्ज दिला होता. तो अर्ज आज न्यायालयाने फेटाळला आहे. अर्ज फेटाळल्यानंतर दुसरा आरोपी विष्णू चाटे आणि इतर सर्व आरोपींनी आम्हाला या खटल्यातून वगळावे दोषमुक्त करावे अशा प्रकारे अर्ज केला. तसेच वाल्मिक कराडने जामिनावर मुक्तता करावी असा देखील अर्ज केला. त्यावर देखील आम्ही आमचे म्हणणे मांडून विरोध केला आहे. आज न्यायालयात ड्राफ्ट चार्ज करून वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदारा विरोधात वेगवेगळ्या कलमाखाली 12 ते 13 आरोप निश्चित केले जावे असा विनंती अर्ज केला आहे. या अर्जाची सुनावणी पुढे होणार आहे. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींनी जे दोष मुक्तीचे अर्ज केले आहेत ते उशिरा दाखल केले आहे. आरोप पत्र दाखल केल्यानंतर दोन महिन्यात अर्ज करणे अपेक्षित होतं. मात्र त्यांनी तो अर्ज केला नव्हता. न्यायालयाने अर्ज फेटाळावे अशी देखील आम्ही मागणी केली आहे. आता 4 ऑगस्ट रोजी यावर सुनावणी होणार आहे, अशी माहिती उज्जवल निकम यांनी दिली.
वाल्मिक कराडचे वकील काय म्हणाले?
वाल्मिक कराडच्या दोष मुक्तीच्या अर्जावर उच्च न्यायालयात दाद मागणार, असं वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे म्हणाले. वाल्मिक कराडच्या दोष मुक्तीच्या अर्जावर सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान न्यायालयाने अर्ज फेटाळला आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे कराडचे वकील विकास खाडे यांनी सांगितले. तर वाल्मीक कराडचा जामीन अर्ज देखील न्यायालयात सादर करण्यात आला आहे. सर्व आरोपींच्या वकिलांकडून दोष मुक्तीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. संपत्ती जप्तीबाबत दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाला. आम्ही जे बँक खाते गोठवण्यात आले. त्यावरील निर्बंध उठविण्याबाबत बाजू मांडली. याबाबत सुनावणी झाली. पुढील तारखेला याबाबत न्यायालय निर्णय देईल, असं विकास खाडे यांनी सांगितले.







