धारूर (बीड) :
धारूर – परभणीहून धारूरमार्गे येत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना तेलगाव–धारूर रस्त्यावर धुनकवड फाट्याजवळ आज दुपारी घडली. जखमींमध्ये पती–पत्नी आणि त्यांच्या दोन लहान मुलींचा समावेश असून सर्वांवर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, अजित पवार यांचा ताफा तेलगावहून केजकडे जात असताना ऑक्सिजन वाहन (क्र. MH 02 GH 5732) चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवल्याने हा अपघात झाला. भोगलवाडी येथील विष्णू सुदे यांच्या दुचाकीला (क्र. MH 44 V 1518) ताफ्यातील ऑक्सिजन टँकर असलेल्या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात विष्णू सुदे, त्यांची पत्नी कुसुम सुदे आणि त्यांच्या दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.
जखमींना तात्काळ अंबाजोगाईला हलविले
अपघातानंतर जखमींना प्रथम धारूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुखापती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
स्थानिकांचा संताप, पोलिसांची गुन्हा नोंद प्रक्रिया सुरू
या दुर्घटनेनंतर तेलगाव–धारूर रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. ताफ्यातील वाहनांच्या वेगामुळे व निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून सामान्य कुटुंबावर आलेल्या या संकटामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली असून संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.









