बीड जिल्ह्यातील तेलगाव–धारूर महामार्गावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कुसुम विष्णु सुदे (वय ३०) यांचे उपचारादरम्यान आज, मंगळवार (दि. २५) रोजी निधन झाले. या दुःखद घटनेने सुदे कुटुंबावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
ही दुर्घटना २२ नोव्हेंबर रोजी घडली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार परतूरहून औसा येथे प्रचारसभेसाठी जात असताना धूनकवड फाटा (धारूर–तेलगाव मार्ग) येथे ताफ्यातील अग्निशामक दलाच्या गाडीने सुदे कुटुंबाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेत कुसुम सुदे, त्यांचे पती विष्णु दामोदर सुदे (३५) आणि दोन लहान मुली रागिणी (९) व अक्षरा (६) गंभीर जखमी झाले. अपघात इतका भीषण होता की दुचाकी पूर्णपणे चकनाचूर झाली आणि चारही जण रस्त्यावर फेकले गेले.
अपघातानंतर स्थानिकांनी तत्परता दाखवत सर्वांना धारूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने सर्वांना तातडीने लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. कुसुम सुदे यांची स्थिती अत्यंत चिंताजनक होती. डॉक्टरांनी जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु गंभीर दुखापतींमुळे आज सकाळी त्यांचे निधन झाले.
कुसुम सुदे यांच्या निधनाने सुदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पती-पत्नी आणि दोन्ही मुली अद्यापही उपचार घेत आहेत.











