बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातल्या सहा नगरपालिकांपैकी बीड नगरपालिका निवडणुकीसाठी सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पक्षाच्या उमेदवारांनी गेल्या काही दिवसांपासून प्रचार सुरु केला असला तरी अपक्ष उमेदवारांना चिन्हाशिवाय प्रचार अडचणीचा होत होता. उद्या तीन वाजेपर्यंत या सर्व अपक्षांना अधिकृत चिन्ह मिळेल आणि शहरात आपआपल्या चिन्हाची ओळख करून देण्यासाठी अपक्ष उमेदवार आपल्या प्रभागात मतदारांपर्यंत जायला मोकळा होईल. उद्यापासून प्रचाराची रणधुमाळी अधिक तीव्र होईल.
बीड शहरात 26 प्रभागातल्या 52 जागांसाठी तब्बल 287 उमेदवार हे नगरसेवक पदासाठी निवडणूक रिंगणात आहेत. यातील शंभरपेक्षा अधिक उमेदवार हे अपक्ष आहेत. गेल्या आठवडाभरापासून भाजपा, दोन्ही राष्ट्रवादी, एमआयएम, वंचित हे पक्ष आपले चिन्ह घेऊन लोकांसमोर प्रचार करत आहेत. त्या पक्षांचे उमेदवार प्रभागामध्ये जात मतं मागत आहेत, परंतु शंभरपेक्षा अधिक अपक्ष असलेल्या उमेदवारांना गेल्या आठवडाभरात प्रचार करताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागले आहे. हे अपक्ष लोकांसमोर तर गेले मात्र बटन कुठलं दाबायचं हे त्यांना सांगता आलेलं नाही. उद्या तीन वाजेपर्यंत या सर्व अपक्षांना चिन्ह मिळणार आहेत. त्यामुळे उद्यापासून ताई-बाई अक्का अमूक अमूक वर मारा शिक्का हे आवाज ऐकायला मिळतील तर सोशल मिडियावरही उमेदवारांना आपला प्रचार करणं सोपं जाईल.









