उपमुख्यमंत्री अजितदादांचे बीडवर लक्ष
परळीत मुंडे भाऊ-बहिणीने दाखविले एकीचे बळ
माजलगाव, धारूरात आ. सोळंकेंची प्रतिष्ठा
पवारांकडून न.प.ची सत्ता घेण्यासाठी अमरसिंह पंडित गेवराईत तळ ठोकून
पुतण्याच्या मदतीला जयदत्त क्षीरसागर थेट प्रचारात
बीड (रिपोर्टर): स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही कार्यकर्त्यांना उभारी देणारी निवडणूक असते. बीड, गेवराई, परळी, अंबाजोगाई, माजलगाव आणि धारूर नगरपालिकेची निवडणूक रणधुमाळी सध्या सुरू आहे. प्रचार मध्यान टप्प्यात आल्याने थंडीत राजकीय वातावरण अत्यंत तप्त झालं असून निवडणुकीच्या रणांगणावर असणार्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मातब्बर नेते त्यांचे सारथी झाल्याचे बीडमध्ये पहावयास मिळत आहे. दस्तुरखुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे, आ. प्रकाश सोळंके, माजी आ. अमरसिंह पंडित, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे प्रचारासाठी गल्लीबोळात पहावयास मिळत असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी ठिकठिकाणी झाडल्या जात आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादांनी 35 वर्षात काय केले? हा सवाल शहरवासियांना रुचत असतानाच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हेही रात्रीपासून आपल्या पुतण्याच्या मदतीला धावल्याचे दिसून येते.






बीड जिल्ह्यातल्या सहा नगरपालिकांच्या निवडणुकीचा प्रचार मध्यान टप्प्यात आलाय. मातब्बर नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक रथाचं सारथी बनणं पसंत केलं. बीडमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी, एमआयएम आणि वंचित हे आमने-सामने उमेदवार पहावयास मिळत असले तरी दोन राष्ट्रवादी आणि एक भाजप यांच्यात काँटे की टक्कर सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अंबाजोगाई, माजलगाव आणि बीडमध्ये प्रचार सभा घेतल्या. बीडच्या सभेत गेली 35 वर्षे काय केले? हा सवाल उपस्थित केला. 35 वर्षांपासून क्षीरसागर कुटुंबियांकडे बीडची सत्ता आहे. आता दोन बंधू वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवत आहेत. योगेश क्षीरसागर भाजपाकडून तर आ. संदीप क्षीरसागर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून. त्यांना सवाल विचारण्याबरोबर पवारांनी पुढची चार वर्षे मी राज्याच्या सत्ताकेंद्रात आहे. माझ्या उमेदवारांना निवडून द्या, मी शहराचा चेहरामोहरा बदलून टाकतो, असे आश्वासन दिले तर रात्रीतून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे जे की राजकीय अज्ञातवासात होते त्यांनी अचानक भूमिका घेत भाजपाचे उमेदवार ज्योती घुंबरे यांचा प्रचार सुरू केला. त्यामुळे योगेश क्षीरसागरांना इथे बळ मिळाला.
परळी नगरपालिकेसाठी पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी काल एकत्रित सभा घेत एकीचे बळ विरोधकांना दाखवून दिले. पंकजा मुंडे या माजलगाव, अंबाजोगाई, धारूर, गेवराई, बीड येथे भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी फिरताना दिसून येत आहेत. त्यांचं ते सारथ्य करत आहेत. तिकडे प्रकाश सोळंके माजलगाव आणि धारूरमध्ये सत्ता आपल्याकडे रहावी यासाठी प्रयत्नांची परिकाष्ठा करीत आहे तर माजी आ. अमरसिंह पंडित हे गेवराईत पवारांच्या हातून सत्ता हिसकावण्यासाठी तळ ठोकून आहेत. एकूणच बीड जिल्ह्यातल्या सहाही नगरपालिकेच्या निवडणुका अत्यंत टफ चालू आहेत.









