बीड (रिपोर्टर): जालन्याहून हुमनाबादकडे सळई घेऊन जाणार्या भरधाव ट्रकने रस्त्यावर पंक्चर झालेल्या खताच्या टेम्पोला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात टेम्पो चालक जागीच ठार झाला, तर दोनजण जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास लोखंडी सावरगावजवळील बीड राज्य महामार्गावर घडला.
मृत टेम्पो चालकाची ओळख ज्योतीराम सदाशिव जाधव (वय 43, रा. लक्ष्मी टाकळी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) अशी झाली असून, एमएच-11 एएल-6375 क्रमांकाचा खताचा टेम्पो पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभा होता. दरम्यान, केए-56-6856 क्रमांकाचा सळई भरलेला ट्रक वेगात येत पाठीमागून टेम्पोवर आदळला. धडकेचा इतका जोर होता की टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पलटी झाला. टेम्पो खाली चिरडल्याने चालक ज्योतीराम जाधव यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांचे पोलिस निरीक्षक मुरलीधर खोकले, सहनिरीक्षक डॉ. चंद्रकांत जगताप, बीट अंमलदार पी. एस. ऊळे, राहुल भोसले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पाठवण्यात आला. जखमींना तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.









