बीड, (रिपोर्टर)ः- सर्व सामान्य नागरीकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल दिले जात आहेत. बीड पंचायत समितीमध्ये मागील काही महिन्यापुर्वी त्याचा लाभ मिळाला. मात्र प्रधानमंत्री आवासा अॅप बंद असल्यामुळे लाभार्थ्यांच अनुदान रखडले आहे. सदरील अॅप लवकर सुरू करून लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग करावे अशी मागणी केली जात आहे.
बीड जिल्ह्यामध्ये दरवर्षी हजारो नागरीकांना घरकुलाचा लाभ मिळत असतो. मागील काही दिवसापासुन बीड तालुक्यातील घरकुल धारकांचे हप्ते रखडलेले आहेत. हप्त्याच्या संदर्भात लाभार्थी दररोज कार्यालयात चकरा मारतात. मात्र त्यांना कार्यालयाकडून वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. प्रधानमंत्री आवासचे अॅप बंद असल्यामुळे लाभार्थ्यांचे हप्ते रखडले असल्याचे सांगण्यात येत आहे. काही लाभार्थ्यांना दोन हप्ते मिळाले तरकाही लाभार्थ्यांना एक हप्ता मिळालेला आहे. प्रलंबित राहिलेले हप्ते लवकर खात्यावर वर्ग करावेत अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे. बहुतांश नागरीकांनी उसनवारी करून घराचे बांधकाम केलेले आहेत. आता त्यांनावेळेवर पैसे मिळत नसल्याने संबंधित लाभार्थी अडचणीत सापडले असून तालुका प्रशासनाने याची दखल घेत लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे टाकण्याची मागणी केली जात आहे.









