बरड फाट्यावर सख्याहर्यांचा राडा
पुण्याला निघालेल्या विवाहित तरुणीला अडवले, भावाला मारहाण करत तरुणीची छेड, ट्रॅव्हल्सवर दगडफेक; तिघांविरुद्ध गुन्हा
केज (रिपोर्टर) पुण्याला जाण्यासाठी आपल्या दोन भावांसह ट्रॅव्हल्सची वाट पहात बरडफाटा येथे उभा राहिलेल्या विवाहित तरुणीला वाईट हेतुने छेडछाड करत दोन भावांना मारहाण करणार्या तिघांविरोधात अखेर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित तरुणीस अश्लाघ्य वाटेल, असे भाष्य करत तिच्याशी ओढाओढी करत संबंधित आरोपींनी ती ट्रॅव्हल्समध्ये बसल्यानंतरही दाबदडप करून ट्रॅव्हल्सवर दगडफेक केली होती. सदरची घटना ही 18 ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत केज तालुक्यातील बणकरंजा येथील नवविवाहिता तक्रारदार आपल्या संग्राम ठोंबरे व विकास ठोंबरे या दोन भावांसोबत पुणे येथे जाण्यासाठी ट्रॅव्हल्सची वाट पहात बरडफाटा या ठिकाणी 18 ऑगस्टच्या रात्री अकरा वाजता उभा होती. त्यावेळी स्कुटी आणि होंडावर हनुमंत ज्ञानोबा मुंडे (रा. मुंडेवाडी), बाबूराव आप्पाराव ढाकणे, पंढरी अशोक ढाकणे (रा. सारुळ) हे त्याठिकाणी आले, त्यावेळी माझ्या भावास ही मुलगी कोण आहे? असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. माझा दुसरा भाऊ सोडवण्यासाठी आला असता त्यालाही दगडाने व काठीने मारहाण केली. या वेळी मी तोंडाला स्कार्फ बांधलेले होते. ते सोडण्यासाठी आरोपींनी माझ्या हाताला ओढत मला लज्जा वाटेल, असे अश्लाघ्य बोलत खाली पाडून मलाही मारहाण केली. त्याचवेळी ज्या ट्रॅव्हल्सची वाट पाहत होते ती ट्रॅव्हल्स आली. त्यातून माझे पती खाली उतरले असता त्यांनाही आरोपींनी मारहाण करण्यास सुरुवात केली. उपस्थितांच्या मदतीने आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलो असता आरोपींनी ट्रॅव्हल्स अडवून त्यावरही दगडफेक केली. सदरचा प्रकार हा तब्बल एक तास चालू होता. शेवटी आणखी दोन ट्रॅव्हल्स घटनास्थळी पोहचल्या. त्या सर्वांच्या मदतीने आम्ही पुढे निघून आलो, अर्ध्या वाटेत उतरून पुन्हा पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिल्याचे संबंधित विवाहित तरुणीने म्हटले. त्या तरुणीच्या फिर्यादीवरून केज पोलिसात आरोपीविरोधात कलम 354, 324, 504, 143, 149 भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल झाला आहे.