नेकनूरच्या बाजारात दिवसाढवळ्या चोरी
चाळीस लाखांची चांदी लंपास
पोलिसांची घटनास्थळी धाव, बाजारात सर्च ऑपरेशन सुरू
नेकनूर (रिपोर्टर): दोन दिवसांपूर्वी बीड शहरात भरदिवसा एका तरुणाची गोळ्या घालून हत्या केल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडवून दिल्यानंतर आज सकाळी नेकनूरच्या बाजारामध्ये अज्ञात चोरट्यांनी पालात दुकान लावत असलेल्या एका सराफाची चांदीची बॅग लंपास केली. यामध्ये तब्बल 15 ते 20 किलो चांदी असल्याचे सांगण्यात येते. त्याची अंदाजे किंमत 40 लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जात असून या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नेकनूर पोलीस डेरेदाखल झाले आणि बाजारामध्ये चोरट्यांचा शोध पोलीसांनी सुरू केला. या चोरीच्या गटनेने पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
याबाबत अधिक असे की, नेकनूर येथील बबनराव कानडे हे सराफा व्यापारी बाजारामध्ये सोन्या – चांदीचा व्यवसाय करतात. आज सकाळी अकराच्या सुमारास ते नेकनूर बाजारामध्ये आणि त्यांनी नेहमीप्रमाणे आपला पाल लावला. हा संक्रातीचा बाजार असल्याने महिलांसाठी चैन, पायातील पैंजन, जोडवे यासह अन्य चांदीचे आभूषण मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आणले होते. त्यांनी आधी पाल लावला, आपल्या जवळील पंधरा ते वीस किलो चांदी असलेली बॅग त्यांनी एका गाड्यावर ठेवली आणि खाली चटई अंथरू लागले तेवढ्या एक ते दीड मिनिटांच्या कालावधीमध्ये अज्ञात चोरट्यांनी त्यांची बॅग लंपास केली. ही घटना दुपारी बाराच्या आसपास घडली. त्यांनी तात्काळ नेकनूर पोलिसांना याची माहिती दिली. याची माहिती पोलीस निरीक्षक आप्पासाहेब रोकडे, पीएसआय तांदळे, पो.कॉ. प्रशांत क्षीरसागर, रतन निनगुडे, बाळा ढाकणे यांच्यासह आदी कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एकीकडे घटनास्थळाचा पंचनामा सुरु असताना दुसरीकडे पुर्ण बाजारात सर्व कर्मचार्यांना अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यास सांगितले. बाजारात सर्च सुरु असून या चोरीच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. चोरीला गेलेल्या चांदीची अंदाजे किंमत 40 लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते.









