माजलगाव (बीड):
वाळूची वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दरमहा २० हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी करणाऱ्या माजलगाव शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी तातडीने कठोर कारवाई करत माजलगाव शहर पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांची तडकाफडकी बदली करत त्यांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी केली आहे.
जिल्ह्यात वाळूचे टेंडर होऊन अवघे चार दिवस उलटले असतानाच हप्तेखोरी सुरू झाल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत कर्मचारी अमोल कदम याने एका तक्रारदाराकडे वाळूची वाहतूक अडथळ्याविना सुरू राहावी, यासाठी दरमहा २० हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम खासगी इसम तात्यासाहेब आर्डे याच्यामार्फत स्वीकारली जाणार होती.
या प्रकरणाची तक्रार जालन्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर उपअधीक्षक बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचला. बुधवारी माजलगाव बायपास रोडवरील लेंडाळ हॉस्पिटलसमोर लाच स्वीकारण्याचा व्यवहार होत असताना, कदमच्या सांगण्यावरून आर्डे याने २० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
तडकाफडकी बदलीचे आदेश
या लाचखोरीच्या प्रकारामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन झाल्याचे लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी तत्काळ प्रशासकीय कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांची तात्काळ बदली करून त्यांची नियंत्रण कक्षात रवानगी करण्यात आली आहे. तर उमाशंकर कस्तुरे (पोलीस निरीक्षक) यांच्याकडे माजलगाव शहर पोलीस ठाण्याचा नवीन पदभार सोपवण्यात आला आहे.
भ्रष्टाचाराविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण
काही दिवसांपूर्वी पाटोदा पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने वाळू प्रकरणात लाच घेतल्याच्या घटनेनंतर तेथील पोलीस निरीक्षकांचीही उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर आता माजलगावमधील या कारवाईमुळे पुन्हा एकदा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
“भ्रष्टाचार करणाऱ्यांची तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही,” असा स्पष्ट संदेश पोलीस अधीक्षकांनी या कारवाईतून दिला आहे









