मुंबई : ऑनलाईन रिपोर्टर
राज्याचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी विधानसभेत सादर करताना शेती, पायाभूत सुविधा, उद्योग, पर्यटन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचा विशेष उल्लेख करत हा अर्थसंकल्प त्यांच्या स्मृतींना समर्पित असल्याचे सांगितले.
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
राज्यातील ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची माफी देण्याची घोषणा करण्यात आली. तसेच जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात, त्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. शेतकरी वारंवार कर्जबाजारी होऊ नये आणि त्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा संकल्प शासनाने व्यक्त केला आहे.
दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन उपाययोजना
२०२६ मध्ये अलनिनोमुळे मान्सूनवर परिणाम होऊन दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार पिण्याच्या पाण्याचे नियोजन, जलयुक्त शिवार आणि जलसंधारणाच्या माध्यमातून पाणी साठवण व संवर्धनासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. तसेच राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.
सौर कृषिपंप योजनेची गिनीज बुकमध्ये नोंद
मुख्यमंत्री बळीराजा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना १०० टक्के वीज बिल सवलत देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. मागेल त्याला सौर कृषिपंप या योजनेतून आतापर्यंत ६ लाखांहून अधिक पंप देण्यात आले असून या योजनेची गिनीज बुकमध्ये नोंद झाल्याचेही जाहीर करण्यात आले.
पायाभूत सुविधांवर मोठा भर
‘महाराष्ट्र अमृतकाल’ योजनेअंतर्गत २०४७ पर्यंत टप्प्याटप्प्याने रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित संरेखनाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मुंबई मेट्रो मार्गिका ११ साठी २३,४८७ कोटी रुपयांचा भूमिगत प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.
मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणारा २२,८६२ कोटी रुपयांचा मुंबई मेट्रो मार्ग ८ प्रकल्प राबविण्यात येणार असून तळोजा ते खांदेश्वर या ५,५७५ कोटींच्या प्रकल्पामुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत वाहतूक सुलभ होणार आहे.
मेट्रो आणि शहरी विकास
मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये एकूण ४९० किलोमीटरच्या मेट्रो मार्गिकांचे काम सुरू असून त्यापैकी १७३ किलोमीटर मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या झाल्या आहेत. आगामी वर्षात आणखी ५० किलोमीटर मार्गिका सुरू होणार आहेत. तसेच अटल सेतू परिसरात ‘तिसरी मुंबई’ विकसित करण्याचे नियोजन आहे.
पर्यटन आणि चित्रपटसृष्टीला चालना
मुंबई, दुबई आणि सिंगापूर येथे पर्यटन गुंतवणूक कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. राज्यातील ५० पर्यटनस्थळांवर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे तिसरी चित्रनगरी उभारण्याची घोषणा करण्यात आली.
मत्स्य व पशुधन क्षेत्राला प्रोत्साहन
मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठी दरवर्षी १,२४० कोटी रुपयांचा आर्थिक भार असलेली मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच पशुपालनाचा कृषी उत्पन्नातील वाटा वाढवण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना सुरू करण्यात येणार आहे. पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्यात आला आहे.
कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढवणार
कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. १० ते १५ पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी उभारली जाईल. पुढील दोन वर्षांत ‘महाराष्ट्र शेती नैसर्गिक अभियान’ या नव्या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
अजित पवारांना श्रद्धांजली
अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री फडणवीस भावुक झाले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दीर्घकाळ अर्थसंकल्प सादर करून राज्याला विकासाची दिशा दिली, असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्यात येईल तसेच त्यांच्या नावाने ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कार’ सुरू करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली.
राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या योजना, शेतकरी व पायाभूत सुविधा क्षेत्रावर विशेष भर आणि आर्थिक प्रगतीचा रोडमॅप मांडणारा हा अर्थसंकल्प असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.








