न्यायव्यवस्था व नियतीने सत्य समोर आणले – लोकायुक्तांच्या निकालावर धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले समाधान
खोटे पुरावे उभे करून बदनामी करून कुणाचेही आयुष्य उध्वस्त करू नका – धनंजय मुंडे यांनी केले कळकळीचे आवाहन
मुंबई (ऑनलाईन रिपोर्टर) –
राज्याच्या कृषीमंत्री पदी असताना केलेल्या कृषी साहित्य खरेदी संदर्भात मा. उच्च न्यायालयापाठोपाठ राज्य लोकायुक्त यांनी देखील आपल्याविरुद्ध केलेले सर्व आरोप फेटाळून लावले असून आपण शासनाच्या नियमानुसार व शेतकऱ्यांचे हित समोर ठेऊनच संबंधित खरेदी बाबतचा निर्णय शासनाच्या विशेष कृती आराखड्याच्या अंतर्गत घेतला होता. या प्रकरणात न्यायव्यवस्था आणि नियतीने सत्य समोर आणले आहे, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी लोकायुक्तांच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले आहे.
आज मुंबईतील विधानभवन येथे धनंजय मुंडे यांनी बऱ्याच दिवसानंतर पत्रकारांशी सविस्तर चर्चा केली.
कृषी साहित्य खरेदी, ऑफिस ऑफ प्रॉफिट असे नाना प्रकारचे आरोप माझ्यावर करण्यात आले, यामध्ये कृषी खरेदीबाबत सुरुवातीला मात. उच्च न्यायालयात ज्यांनी तक्रार केली होती, त्यांना खोटे पुरावे दिले आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून शासनाची बदनामी केली म्हणून उच्च न्यायालयाने एक लाखांचा दंड ठोठावला, त्यांनी तो भरला सुद्धा.ऑफिस ऑफ प्रॉफिट, पिक विमा असा कोणताही आरोप सिद्ध झाला नाही, मात्र माझ्या बदनामीच्या ट्रायल रंगवून दाखवल्या केल्या.
हे एक मोठे षडयंत्र असून, मला केवळ राजकारण किंवा समाजकारण यामधून संपवायचे नाही तर काही लोकांना मी या पृथ्वीतलावर नको आहे, त्यातून हे सगळे घडवून आणले जात असल्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना केला.
अंजली दमानिया यांच्या बाबत विचारले असता धनंजय मुंडे म्हणाले की त्यांनी संपूर्ण जीवनात नितीन गडकरी साहेब, स्व. अजितदादा, खडसे साहेब, भुजबळ साहेब, तटकरे साहेब अशा अनेक नेत्यांवर ढीगभर आरोप करून बदनामी केली, मात्र त्यांनी केलेला एकतरी आरोप कुठे सिद्ध झालेला आहे का?
केवळ खोटे पुरावे समोर आणायचे, माध्यमांच्या समोर सनसनी निर्माण करायची आणि एखाद्याला बदनाम करायचे, हे सगळे थांबवले गेले पाहिजे. असे कळकळीचे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले. तर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आपण सध्यातरी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार नसल्याचे मुंडेंनी स्पष्ट केले.
दरम्यान मागील काही महिन्यांपासून आपल्या विरुद्ध मोठे षडयंत्र रचले जात आहे. त्यातूनच रोज नवनवीन आरोप आणि बदनामीची एक अजब मालिका सुरू आहे. मात्र न्यायव्यवस्थेसमोर एकही आरोप सिद्ध झालेला नाही. आपली बाजू सत्याची आणि त्यामुळेच नियती आपल्या सोबत आहे; त्यामुळे सहकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील संयम ठेवावा, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.









