बीड (रिपोर्टर): देशात गॅस सिलेंडरच्या टंचाईबाबत चर्चा सुरू असताना काही सायबर गुन्हेगारांनी त्याचाच गैरफायदा घेत नागरिकांची फसवणूक करण्याचा नवा प्रकार सुरू केला आहे. स्वतःला गॅस कंपनीचे अधिकारी असल्याचे सांगून फोन करणे, गॅस कनेक्शन बंद होणार असल्याची भीती दाखवणे आणि त्यानंतर मोबाईलवर लिंक किंवा एपीके (-झघ) फाइल पाठवून नागरिकांची बँक खात्यातील रक्कम लंपास करण्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहन सायबर तज्ज्ञ व पोलिसांकडून करण्यात येत आहे.
माहितीनुसार, सायबर गुन्हेगार प्रथम नागरिकांना फोन करून ते गॅस कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवतात. त्यानंतर तुमचे गॅस कनेक्शन लवकरच बंद होणार असल्याचे सांगून भीतीचे वातावरण निर्माण करतात. समस्या सोडवण्यासाठी किंवा गॅस कनेक्शन सुरू ठेवण्यासाठी मोबाईलवर एक लिंक किंवा एपीके फाइल पाठवली जाते. संबंधित व्यक्तीने ती लिंक क्लिक केली किंवा फाइल डाउनलोड केली की मोबाईलमध्ये मालवेअर इन्स्टॉल होते. त्यानंतर मोबाईलमधील बँकिंग माहिती, ओटीपी आणि इतर गोपनीय माहिती हॅक करून गुन्हेगार बँक खात्यातील पैसे ट्रान्सफर करतात. सायबर तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या लिंक किंवा एपीके फाइल्स अत्यंत धोकादायक असतात. मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर त्या फोनवरील बँकिंग अॅप, मेसेज आणि इतर माहितीवर नियंत्रण मिळवतात. त्यामुळे आर्थिक फसवणुकीची शक्यता वाढते. नागरिकांनी अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी काही मूलभूत काळजी घेणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तीकडून आलेली कोणतीही लिंक किंवा एपीके फाइल कधीही डाउनलोड करू नये. तसेच ओटीपी, एटीएम पिन, बँक खाते क्रमांक किंवा इतर गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये. संशयास्पद फोन कॉल आल्यास तात्काळ फोन कट करावा आणि संबंधित कंपनीच्या अधिकृत अॅप किंवा वेबसाइटवरूनच माहितीची खात्री करावी. दरम्यान, जर कोणाची सायबर फसवणूक झाली असेल तर त्वरित 1930 या राष्ट्रीय सायबर क्राइम हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा लूलशीलीळाश.र्सेीं.ळप या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनीही नागरिकांनी जागरूक राहून अशा प्रकारच्या फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करावे, असे आवाहन केले आहे.








