‘
अंबाजोगाई (रिपोर्टर): येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या डीन यांनी अजब फतवा काढल्याचे निदर्शनास येत असून रुग्णालयात येणार्या रुग्णांच्या नातेवाईकांनी पादत्राने घालून येऊ नये या आदेशाचे तंतोतंत पालन नातेवाईकांनी केले, रुग्णालयाच्या बाहेर गेटवर त्यांनी पादत्राने सोडले, मात्र डीन यांनी सुरक्षा रक्षकांना सांगून या सर्व नातेवाईकांची पादत्राने एका पोत्यात भरून जप्त केल्याचे समोर आले आहे. रुग्णालयातील कर्मचारी पादत्रान्यांसह रुग्णालयात प्रवेश करतात मात्र नातेवाईकांना पादत्राने विना प्रवेश करण्याच्या सूचना दिल्या जातात. पादत्राने बाहेर सोडले तर तेही उचलून नेले जातात. यामुळे सर्वसामान्यांत संताप व्यक्त केला जात आहे.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये रुग्णांना भेटीसाठी येणार्या नातेवाईकांनी पादत्राने बाहेर सोडावेत, अशा सूचना संबंधित डीनने दिल्या. त्यानुसार नातेवाईक हे आपले पादत्राने रुग्णालय बाहेर सोडतात. याउलट हा नियम फक्त रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आहे. रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, नर्स हे पादत्राण्यांसह रुग्णालयात सर्रासपणे फिरताना दिसतात. आजतर अंबाजोगाईच्या एसआरटी रुग्णालयाचे डीन यांनी रुग्णालयाच्या गेटवर सोडलेले अनेक चपला, बुट सुरक्षा रक्षकाच्या माध्यमातून एका पोत्यात भरले आणि घेऊन गेले. उन्हाची तीव्रता वाढत असलयाने प्रत्येकजण पादत्राण्यांशिवाय बाहेर फिरू शकत नाही, डीन यांचा हा आतेताईपणा आणि कर्मचार्याला एक न्याय व नातेवाईकांना दुसरा न्याय यावर संताप व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर पादत्राने नेमके कुठे सोडायचे? यबाबत डीन यांनी जागा तरी निश्चित करून द्यावी.








