13 कोटी 6 लाख बीड जिल्ह्याला मिळाले
बीड (रिपोर्टर) इ.स. 2018 साली बीड जिल्ह्यात भयाण दुष्काळ निर्मार झाला. चार्या-पाण्याचा प्रश्न आवासून उभा राहिला. अशा परिस्थितीत शासनाने योजलेल्या कार्यक्रमांतर्गत जनावरांच्या चारा छावण्या सेवाभावी संस्थांमार्फत उभारण्यात आल्या. हजारो गोधनाचे पोट या चारा छावण्यात भरले गेले, मात्र चारा छावण्यांचे देयके देताना राज्य सरकारने 20 टक्के निधी राखून ठेवला. 2018 पासून आजपावेत चारा छावणीचालक हा निधी मिळावा म्हणून प्रयत्नशील होते, मात्र कृषी खात्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी यात अखेर लक्ष घालत चारा छावणी चालकांचे देयक त्यांना देण्यात यावेत यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करत ते देयके देण्यास लावले. अखेर चालू अधिवेशनात या देयकांबाबत निधीची तरतूद करण्यात आली. बीडसह औरंगाबाद जिल्ह्याला तब्बल 15 कोटींचा निधी तात्काळ वाटप करण्याचे आदेश दिल्याने बीड जिल्ह्यासाठी 13 कोटी 6 लाख 44 हजार 668 रुपये आज मितीला बीड जिल्ह्याला आला.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नामुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तडकाफडकी निर्णयामुळे अखेर औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातील चारा छावणी चालकांना दिलासा मिळाला. औरंगाबाद आणि बीड या दोन जिल्ह्यातील चारा छावणी चालकांचा निधी राज्य सरकारकडून वारंवार मागणी करूनही मिळत नव्हता. याबाबतची छावणी चालकांकडून मागणी सरकारकडे, कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येत होती. याची दखल घेऊन नुकत्याच सत्तांतर झालेल्या सरकारमधील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन या चारा छावणी चालकांसाठी निधीची तरतूद करून तात्काळ हा निधी औरंगाबाद विभागीय आयुक्तांकडे सुपुर्द केला आहे. बीड आणि औरंगाबाद या दोन जिल्ह्यांसाठी 15 कोटी 38 लाख 68 हजार 119 इतका निधी आयुक्त कार्यालयाला प्राप्त झाला असून आयुक्त कार्यालयाने तात्काळ हा निधी जिल्हाधिकारी औरंगाबाद आणि बीड यांना वितरीत करण्याचे आदेश राज्य शासनाचे उपसचिव संजय धारूरकर यांनी काढलेले आहेत. त्यामुळे चारा छावणी चालकांचे अडकलेले बिले तात्काळ मार्गी लागतील.