बीड (रिपोर्टर) श्रीक्षेत्र भगवानगडाच्या विकासासाठी गावागावातून मोठ्या प्रमाणावर देणगी देण्यात येत असून आज शिरूर तालुक्यातील माळेगाव या लहानश्या गावाने गडाला तब्बल 66 लाख रुपये देणगी दिली असल्याचे श्रीक्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती ह.भ.प. डॉ. नामदेव शास्त्री यांच्यासह उपस्थित गावकर्यांनी दिली. या वेळी भगवान बाबा की जय चा जयघोष करत ज्ञानेश्वर माऊलींचे नामस्मरण करण्यात आले.
श्रीक्षेत्र भगवानगडाच्या विकासासाठी गावागावातून देणग्या देण्यास सुरुवात झाली आहे. स्वखुशीने आणि उत्स्फूर्तपणे भगवानगडाचे पाईक आणि वारकरी संत ज्ञानेश्वरांच्या व संत भगवानबाबांच्या आशीर्वादाने भगवानगडाचा विकास व्हावा, गडाच्या विकासात कुठेही खंड पडू नये म्हणून देणगी देण्यासाठी पुढे येत आहेत. आज शिरूर तालुक्यातील माळेगाव येथील ग्रामस्थांनी भगवानगडाच्या विकासासाठी तब्बल 66 लाख रुपयांची देणगी जाहीर केली. ह.भ.प. डॉ. नामदेव शास्त्री हे आज सकाळी माळेगावात आले होते. या वेळी उपस्थित भक्तांसह गावकर्यांनी देणगीचा आकडा जाहीर केला. उपस्थितांनी संत भगवान बाबा की जय चा जयजयकार करत श्रीसंत ज्ञानेश्वर माऊलींचे नामस्मरण केले.