हात आणि पाय मिळताच दिव्यांगाचे चेहरे उजळले
गेवराई (रिपोर्टर) सामान्यांच्या प्रश्नांची जाणिव ठेवून त्यांचे प्रश्न पोट तिडकीने मांडणारे अमरसिंह पंडित आणि त्यांचे काम आम्ही जवळून पाहिले आहे. शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आतापर्यंत विविध समाजोपयोगी उपक्रम घेतले असून आज त्यांनी माणुसकीचा धर्म सांभाळत दिव्यांगाना फार मोठा आधार दिला आहे असे प्रतिपादन शिरूर हवेलीचे आ. अशोकराव पवार यांनी
प्रतिष्ठान आणि साधू वासवाणी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत कृत्रिम हात व पाय वाटप समारंभात ते बोलत होते.
विधान सभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शारदा प्रतिष्ठान, गेवराई आणि साधू वासवाणी मिशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि.24 जुलै रोजी गेवराई येथे झालेल्या मोफत कृत्रिम हात व पाय शिबीरातील पात्र लाभार्थ्यांना रविवार, दि.28 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष कृत्रिम हात व पाय या अवयवांचे वाटप करण्यात आले. र.भ.अट्टल महाविद्यालय, गेवराई येथे झालेल्या कार्यक्रमाला शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार, प्रतिष्ठानचे कार्यवाह अमरसिंह पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ड.राजेश्वर चव्हाण, माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, भवानी बॅकेचे अध्यक्ष बप्पासाहेब मोटे, सभापती बाबुराव जाधव, साधु वासवाणी मिशनचे मिलिंद जाधव, सुशिल ढगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, जयभवानीचे उपाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, पाटिलबा मस्के, जि. प. सदस्य फुलचंद बोरकर, माजी सभापती कुमारराव ढाकणे, किशोर कांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण म्हणाले की अमरसिंह पंडित हे एक दिलदार व्यक्तिमत्व असून गोरगरिबांच्या वेदनेवर त्यांनी कायम फुंकर घातली आहे. ज्यांचे संसार उघड्यावर पडले अशांना वेळेवर धावून जाऊन त्यांनी मदत केली आहे. शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज त्यांनी जवळपास तीन कोटी रुपयांचे कृत्रिम अवयव गरजवंतांना वाटप करून त्यांचे दुःख वाटून घेतले आहे. आपल्या प्रास्ताविकात अमरसिंह पंडित यांनी साधु वासवाणी मिशनचे आभार माणून यापुढेही सामाजिक उपक्रमात शारदा प्रतिष्ठान अग्रेसर राहील. आज 271 दिव्यांगाना कृत्रिम हात आणि पाय देण्यात येत आहेत असेही ते म्हणाले.
शारदा प्रतिष्ठानने गरजूंना पाय दिले -फैय्याज पठाण
या शिबिरात बर्दापूर ता.अंबाजोगाई येथून आलेले फैय्याज पठाण प्रातिनिधिक स्वरूपात बोलताना म्हणाले की, हात पाय नसणे म्हणजे जिवनात आनंद नसणे. आज गरजूंना कृत्रिम हात पाय देण्याचे मोठे काम शारदा प्रतिष्ठान आणि साधु वासवाणी मिशनने केले आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात अर्जुन जाधव यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृत्रिम पाय देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव चाटे यांनी करुन उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाला गेवराई तालुक्यासह संपुर्ण बीड जिल्ह्यातून आलेल्या दिव्यांगासह, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, साधु वासवणी टिमचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.