धारूर (रिपोर्टर) गोपाळपूर ग्रामपंचायतचा अंधाधूंद कारभार सुरू आहे. गरज नसताना नको त्या ठिकाणी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला. या प्रकरणाची चौकशी करून दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढत गटविकास अधिकार्यांना घेराव घालून दोनशेपेक्षा जास्त महिला कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसल्या आहेत.
चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत जी कामे झाली आहेत त्या कामात ग्रा.पं.च्या सदस्यांसह सरपंचांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला. वडारवाडा (संभाजीनगर) या ठिकाणी पाईपलाईन करण्यात आली होती. सदरील ही पाईपलाईन बोगस झाली. गरज नसताना पाईपलाईन करण्यात आली. यापुर्वीही या ठिकाणी पाईपलाईन होती तरीही दुसर्यांदा पाईपलाईन करण्याचा कारण काय, असा प्रश्न उपस्थित करत ग्रा.पं.अंतर्गत झालेल्या कामांची चौकशी करून दोषींविरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शंभर ते दोनशे महिलांनी कार्यालयावर मोर्चा काढून गटविकास अधिकार्यांना घेराव घातला होता. सदरील महिला या कार्यालयासमोर
उपोषणाला बसल्या आहेत. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येत आहे. दोषींविरोधात कारवाई करू, असे आश्वासन गटविकास अधिकारी कांबळे यांनी दिले आहे.