बीड (रिपोर्टर) आपल्या बहिणीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून एका 26 वर्षीय तरुणाची चालत्या मोटारसायकलवर भोसकून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान बीडपासून काही अंतरावर असलेल्या शांतीवन परिसरात घडली. घटनेची माहिती समजताच डीवायएसपींसह बीड ग्रामीण ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. खून करून आरोपी फरार झाला होता मात्र पोलिसांनी त्याला आज सकाळी केजमधून ताब्यात घेतले.
ब्रम्हदेव हनुमान कदम (वय 26 वर्षे, रा. मांडवजाळी) या अविवाहित तरुणाचे मित्र सिद्धेश्वरच्या घरी येणेजाणे होते. सिद्धेश्वरची बहीण नांदत नव्हती. ब्रम्हदेव आणि सिद्धेश्वरच्या बहिणीचे सूत जुळले. यात त्याचे प्रेमात रुपांतर झाले. याची भनक सिद्धेश्वरला लागली होती. 22 मे रोजी रात्री साडेनऊ वाजता ब्रह्मदेव हा समाधान भंडाणे व बबन बहिरवाळ यांच्या समवेत जेवण करण्यासाठी बीड शहरापासून जवळच असलेल्या मंझेरी फाट्यावर गेला होता. दहा वाजता ब्रम्हदेव यास सिद्धेश्वरने फोन करून ‘कुठे आहेस?’ अशी विचाणा केली असता त्याने ‘धाब्यावर आहे’, असे सांगितले. काही मिनिटांनी सिद्धेश्वर बहिरवाळ त्याठिकाणी पोहचला. तेथे त्यानेही जेवण केले. त्यानंतर तिगे दुचाकीवरून गावी जाण्यासाठी निघाले. समाधान भंडाणे व बबन बहिरवाळ एका दुचाकीवर तर ब्रह्मदेव कदम व सिद्धेश्वर बहिरवाळ दुसर्या गाडीवर होते. ब्रम्हदेव हा दुचाकी चालवत असताना शांतीवन जळ पाठीमागे बसलेल्या सिद्धेश्वर बहिरवाळने त्याच्या पोटात चाकुने सपासप वार केले. दुचाकीचा ताबा सुटल्यावर दोघेही खाली पडले. त्यानंतर समोरील दोघे परत आले तेव्हा सिद्धेश्वर बहिरवाळच्या हातात चाकू व ब्रम्हदेव कदम बेशुद्धावस्थेत पडलेला आढळला. त्यास रोखण्याचा प्रयत्न केला मात्र दुचाकीवरून तो फरार झाला होता. त्यानंतर दोघांनी जिल्हा रुग्णालयात त्यास दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषीत केले. घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना झाल्यानंतर घटनास्थळी उपअधिक्षक श्रीपाद परोपकारी, ग्रामीण ठाण्याचे संतोष साबळे, योगेश उबाळे, देवीदास उबाळे, पी.टी. चव्हाण, आनंद मस्के, विजय जाधव, गणेश कांदे, अनिल घटमळ यांनी भेट दिली. सदरील फरार आरोपीचा बीड ग्रामीण पोलिसांनी मोबाईल लोकेशननुसार शोध घेतला. त्यास आज सकाळी केजमधून ताब्यात घेण्यात आले.