मुकुंदराज परिसरातील येल्डा घाटात घडली घटना,जखमीत महिला, बालकांचा समावेश
अंबाजोगाई (रिपोर्टर) कर्नाटक राज्यातील साखर कारखान्याकडे ऊस तोड कामगार घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली मुकुंदराज परिसरातील येल्डा घाटात पलटी झाली. या अपघातात 11 वर्षांचा मुलगा जागीच ठार झाला तर अन्य 15 जण गंभीर जखमी असून एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. आज शुक्रवारी (दि.30) सकाळी हा अपघात झाला. रस्त्यावरील खड्ड्यात आदळून ट्रॅक्टर हेडला ट्रॉली जोडणारा रॉड तुटून हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा आणि परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील ऊसतोड कामगार सर्व आवश्यक समान, भांडीकुंडी घेऊन ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून शुक्रवारी भल्या पहाटे कर्नाटकातील साखर कारखान्याकडे निघाले होते. ट्रॅक्टर अंबाजोगाई येल्डा मार्गावर असताना सकाळी पावणेसातच्या सुमारास मुकुंदराज परिसरातील बुट्टेनाथ घाटातील एका
अवघड वळणावरील खड्ड्यात आदळून ट्रॅक्टर हेडला ट्रॉली जोडणारा रॉड तुटला आणि ट्रॉली पलटी झाली. यामुळे ट्रॉलीत बेसावध बसलेले सर्व महिला, पुरुष, बालके खाली पडले तर काही ट्रॉलीखाली अडकले. या भीषण अपघातात रणजीत अमोल कांबळे (वय 11, रा. येल्डा) या बालकाचा जागीच मृत्यू झाला. तर, अनिता बालू पवार (30), अनुजा अमोल कांबळे (7), दादाराव धनू गायकवाड (37), उषा धनंजय गायकवाड (25), आशा बालू माळी (22), कोमल अमोल कांबळे (45) सर्व रा. एलडा ता. अंबाजोगाई, ललिता दशरथ तिकटे (35), महादेव धुराजी मगर (28), सुरेखा सुधाकर गवारे (32), सुधाकर दिगंबर गवारे (35), रुबिन जलील सय्यद (20), अलिदा जलील सय्यद (47), सारिका महादेव मगर (30), आशा बालू माळी (22) मंगेश दशरथ तिकटे (16) आणि धुराजी माणिक मगर (65) सर्वरा. सोनपेठ, जि. परभणी हे 15 जण जखमी झाले. सर्व जखमींवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमीपैकी ललिता तिकटे या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.
कंत्राटदर कंपनी, वन विभागाविरोधात प्रचंड रोष
अंबाजोगाई येल्डा मार्गावर प्रचंड मोठे खड्डे झाले आहेत. त्यातून नेहमीच लहानमोठे अपघात घडत आहेत. या रस्त्याचे काम ड्रीम कन्स्ट्रक्शन, नंदुरबार या कंपनीकडे आहे. किरकोळ कारणावरून वन विभागाने हे काम रोखले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदर कंपनी आणि वन विभागाविरोधात ग्रामस्थात प्रचंड रोष दिसून आला. अपघात आणि बळीसाठी गुत्तेदार आणि वनविभाग जम्मेदार असल्याचा आरोप व्यंकटेश चामनर यांनी केला.