पंकज कुमावत यांच्या पथकाची कारवाई
बीड (रिपोर्टर) पेठबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बार्शीनाका येथे अवैध गुटख्याची विक्री होत असल्याची कुमावतांच्या पथकाला मिळाल्यानंतर काल त्या ठिकाणी छापा टाकून 94 हजाराच्या गुटख्यासह 80 हजाराची कॅश जप्त करण्यात आली.
पेठबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बार्शीनाका येथील शेख नईम शेख रहीम हा बार्शीनाका येथे अल्ताफ नावाच्या दुकानात गुटखा साठवणूक आणि विक्री करत असल्याची माहिती सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या पथकाला पाठवून त्याठिकाणी धाड टाकली असता तेथे 94 हजार 779 रुपयांचा गुटखा मिळून आला. त्यासोबत पोलिसांनी तेथील 80 हजार 550 रुपयांची कॅशही जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. ही कारवाई पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील बालाजी दराडे आणि कर्मचार्यांनी केली. या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात चार गुटखा माफियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.