कामात सुधारणा करा; बीड पोलिस अधिक्षकांनी काढल्या 17 ठाणेप्रमुखांना नोटीस
गणेश जाधव । बीड
पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांनी पदभार घेताच आपल्या ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेले सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करण्याचे आदेश ठाणेप्रमुखांना दिले होते. मात्र तरी देखील काही ठिकाणी अवैध धंदे सुरुच असल्याचे विशेष पथकाने टाकलेल्या धाडीतून निदर्शनास आले आहे. तर काही ठाण्यात अनेक गुन्ह्याचा तपास रखडलेला आहे. अशा 17 ठाणेप्रमुखांना पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी थेट नोटीस काढत कामकाज सुधारण्याचे आदेश दिले आहेत.
आमच्या ठाण्याच्या हद्दीत सर्व काही सुरळीत सुरु असल्याचा आव ठाणेप्रमुख आणतात. मात्र एसपींच्या विशेष पथकाने ठिकठिकाणी धाडी टाकून अनेक ठाण्याच्या हद्दीत राजरोज सुरु असलेल्या अवैध धंद्याचा पर्दाफास केलेला आहे. पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांनी पदभार घेतात सर्व ठाण्यांना स्वत: भेटी देवून कारभार पारदर्शक करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र तरी देखील काही ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु आहेत. हे विशेष पथकांनी टाकलेल्या धाडीतून समोर आले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील 17 ठाणेप्रमुखांना एसपी ठाकूर यांनी स्वत: नोटीस काडत कामकाज सुधारण्याच्या सुचना केल्या आहेत.