सेवा संस्था मतदारसंघातून ११ जागांसाठी होत आहे निवडणूक
जिल्ह्यातील ७३५ सेवा संस्थांपैकी केवळ १३ संस्थांचे लेखापरिक्षण ‘अ’ किंवा ‘ब’ वर्गाचे
बीड (रिपोर्टर)- सेवा संस्था मतदारसंघातून जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्यासाठी संबंधित संस्था अ किंवा ब वर्गातीलच असायला हवी या नियमामुळे सेवा संस्था मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्वचे सर्व ८७ उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने बीड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत मोठा पेच निर्माण झाला असून आता या निवडणुकीसाठी स्टे येतो की, निवडणुकच रद्द होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज बाद झाले आहेत. ७३५ सेवा संस्थांपैकी अवघ्या १३ संस्थांचे लेखा परिक्षण अ किंवा ब वर्गात असल्याचे सांगण्यात येते.
बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लागल्यानंतर १९ जागांसाठी तब्बल १६० जणांनी २१४ उमेदवारी अर्ज दाखल केले. या संस्थेच्या सेवा संस्था मतदारसंघातून तब्बल ८७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये सर्वच पक्षांच्या अनेक मातब्बरांचा समावेश आहे. आज उमेदवारी अर्ज छाननी सुरू झाली तेव्हा धक्कादायक बाब समोर आली. सेवा संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी संबंधित उमेदवार हा ज्या संस्थेमध्ये सदस्य आहे त्या संस्थेचा दर्जा (ऑडीट वर्ग) हा अ किंवा ब असायला हवा. परंतु बीड जिल्ह्यातील ७३५ सेवा संस्थांपैकी अवघ्या १३ संस्थांचे लेखापरिक्षण हे अ किंवा ब आहे, बाकी सर्व संस्था या ‘क’ वर्गात येतात. त्यामुळे डीसीसी बँक निवडणुकीच्या उपविधी नियमानुसार सेवा संस्था निवडणुकीत दाखल करण्यात आलेले ११ जागांसाठीचे ८७ अर्ज बाद होत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी रविकिरण देशमुख आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी गोपालसिंह परदेशी यांच्या उपस्थितीत आज सकाळी ११ वाजल्यापासून छानणी प्रक्रिया सुरू आहे. यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्वच पक्षांचे मातब्बर उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्ज बाद होऊ नये म्हणून वकिलाच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकार्यासमोर युक्तीवादही झाला. परंतु बँकेच्या उपविधी नियमानुसार निवडणूक निर्णय अधिकार्यांनी संबंधित ८७ उमेदवारांचे अर्ज बाद केले. यामध्ये विजयसिंह पंडित, बाबूराव सिरसट, फुलचंद मुंडे, महेंद्र गर्जे, वसंत सानप, अशोक लोढा, सत्यभामा बांगर, दशरथ वनवे, राजेंद्र मस्के, दाजीसाहेब लोमटे, ऋषिकेश देशमुख, वैजिनाथ मिसाळ, जयदत्त धस, मंगल सानप यांच्यासह अकरा जागांसाठी उमेदवारांनी ८७ अर्ज दाखल
केले होते ते सर्वचे सर्व बाद होताना दिसून येत आहे.
डीसीसी बँक निवडणुकीत मोठा पेच
अ, ब दर्जाअभावी सेवा संस्था गटातील ८७ अर्ज बाद झाल्यामुळे नियोजीत निवडणूक होणार की नाही यावर चर्चा होत असताना काही जाणकारांच्या मते एकतर या निवडणुकीवर स्टे येईल अथवा पुन्हा प्रशासक लागून नंतर निवडणुकीची घोषणा होईल.
आठ जागांसाठी निवडणूक होणार का?
एकूण १९ जागांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होत आहे मात्र सेवा संस्था गटातील अकरा जागांसाठीचे अर्ज बाद झाल्यामुळे अन्य आठ जागांसाठी निवडणूक होणार का? जर निवडणूक झाली तरी आठ जागातून अध्यक्ष निवड करता येणार आहे का? अशा एक ना अनेक तांत्रिक बाजूंनी बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला घेरून ठेवले आहे. राज्याचे सहकार निवडणूक लवाद प्राधिकरण काय निर्णय घेईल यावर बँकेचे भवितव्य ठरणार आहे.