बीड (रिपोर्टर) जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्यांचा अनागोंदी कारभार अद्यापही थांबलेला नाही. कर्मचार्यांनी वेळेवर यावे, अशा सक्तीच्या सूचना आतापर्यंत अनेकवेळा देण्यात आल्या. त्याचा कसलाही फरक काही कर्मचार्यांवर पडला नसल्याचे दिसून येऊ लागले. बहुतांश कर्मचारी आज उशीरा कार्यालयीन कामकाजासाठी आलेले होते. अकरा वाजेपर्यंत सगळे टेबल रिकामे दिसून आले. जिल्हा शल्यचिकित्सकांनी राऊंड घेतल्यानंतर सदरील प्रकार दिसून आला. त्यामुळे डॉ. साबळे चांगलेच संतापले होते.
जिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय विभागातील बहुतांश कर्मचारी कामचुकारपणा करत असल्याचे नेहमीच समोर आलेले आहे. सर्व कर्मचार्यांनी वेळेवर येऊन आपआपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सकांनी वेळोवेळी दिलेले आहेत. आज डॉ. साबळे यांनी काही प्रशासकीय विभागांची पाहणी केली असता त्यांना अकरा वाजेपर्यंत एकही कर्मचारी आपल्या टेबलवर हजर नसल्याचे दिसून आल्याने त्यांनी चांगलाच संताप व्यक्त करत कर्मचार्यांना पुन्हा एकदा वेळेवर येण्याच्या सूचना बजावल्या आहेत.