मुंबई (रिपोर्टर) भारतासह जगभरातील अनेक देशांत मंगळवारी व्हॉट्सअॅपची सेवा जवळपास दीड तास ठप्प झाली होती. यासंबंधीच्या वृत्तानुसार, व्हॉट्सअॅपची सेवा दुपारी 12.30 च्या सुमारास विस्कळीत झाली. जवळपास दीड तासानंतर दुपारी 2 वाजून 6 मिनिटांनी ती पुन्हा पूर्ववत झाली. सरकारने व्हॉट्सअॅपची पॅरेट कंपनी मेटाकडून या गडबडीचा अहवाल मागवला आहे.
भारतात महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेशासह अनेक शहरांतील वापरकर्त्यांनी याची तक्रार मेटा-ओन्ड कंपनीकडे केली होती. वेबसाइट ट्रॅकर डाउन डिटेक्टरनुसार, 3 हजारांहून अधिक लोकांनी यासंबंधीची तक्रार नोंदवली. व्हॉट्सअॅप सर्व्हर डाउन झाल्याची बातमी ट्विटरवरही ट्रेंड करत होती. जगभरात व्हॉट्सअॅपचे 2 अब्जांहून अधिक मासिक वापरकर्ते आहेत.
व्हॉट्सअॅप बंद झाल्याची बातमी दुपारी 12.30 च्या सुमारास आली. आउटेज ट्रॅकिंग कंपनी डाउन डिटेक्टरवर 67% लोकांनी मेसेज सेंड करण्यात अडचण येत असल्याची तक्रार नोंदवली. सेवा बंद झाल्याच्या एका तासानंतर व्हॉट्सअॅपची पॅरेंट कंपनी मेटाचा प्रवक्ता म्हणाला – ‘काही लोकांना संदेश पाठवण्यात अडचण येत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. कंपनी लवकरात लवकर सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहे.’ कंपनीने या तांत्रिक बिघाडाचे कोणतेही कारण दिले नव्हते.